रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याज दरकपातीबाबत आशा उंचावल्या!
देशाच्या सेवा क्षेत्राचा वेग मंदावून तो तीन महिन्यांपूर्वीच्या स्तरावर रोडावणे आणि नवीन कार्यविधींचाही (ऑर्डर्स) अभाव असल्याचे फेब्रुवारी महिन्याच्या मासिक सर्वेक्षणाने स्पष्ट केले असल्याने, रिझव्‍‌र्ह बँकेकडून वृद्धीला पूरक ठरेल अशा व्याज दरकपातीच्या अपेक्षेने पुन्हा डोके वर काढले आहे.
फेब्रुवारी २०१६ साठी गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या निक्केई सेवा व्यवसाय निर्देशांक हा जानेवारीतील ५४.३ पातळीवरून ५१.४ वर म्हणजे तीन महिन्यांच्या नीचांक पातळीवर गेल्याचे स्पष्ट होत आहे. किमती वाढल्याने मागणी घटल्याचा हा सुस्पष्ट परिणाम आहे. फेब्रुवारी महिन्यात सेवा क्षेत्रात नव्या ऑर्डर्सचा ओघ वाढलेला असला तरी हा वाढीचा दर गत नोव्हेंबरनंतरचा सर्वात कमी असल्याचा निष्कर्षही सर्वेक्षणाने मांडला आहे. सेवा क्षेत्रातील व्यावसायिकांना नवीन कामे मिळविण्यासाठी खूप कडवी स्पर्धा करावी लागल्याचे सर्वेक्षण सांगते.
दरम्यान निक्केई मार्किटच्या निर्मिती आणि सेवा अशा दोन्ही क्षेत्रांना सामावून घेणाऱ्या संमिश्र भारतीय पीएमआय उत्पादन निर्देशांकाने जानेवारीमधील ११ महिन्यांतील ५३.३ या उच्चांकी पातळीवरून फेब्रुवारीत ५१.२ अशी घसरण दाखविली आहे. जे सरलेल्या फेब्रुवारीत देशातील अर्थवृद्धी लक्षणीय नरमल्याचे चित्र पुढे आणते. जागतिक आर्थिक आव्हानांच्या पाश्र्वभूमी आणि देशांतर्गत घसरत असलेल्या किमतींनी दिलेला दिलासा पाहता, रिझव्‍‌र्ह बँकेला वृद्धीपूरक पवित्रा घ्यायला वाव आहे, असे ‘मार्किट’च्या अर्थतज्ज्ञ पॉलियाना डी लिमा यांनी मत व्यक्त केले.