विदेशी गुंतवणूकदार संस्थांचा भांडवली बाजारातून काढता पाय, भडकते इंधन दर, घसरता रुपया या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले. रेपो रेट अर्थात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले. रेपो रेट ६. ५ टक्के असेल. तर रिव्हर्स रेपो रेट ६.२५ टक्के इतका असेल. रिझर्व्ह बँक ज्या दराने भारतीय बँकांना पतपुरवठा करते त्याला रेपो रेट म्हणतात. तर भारतीय बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे ठेवलेल्या ठेवींवर देण्यात येणाऱ्या व्याजाला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या नेतृत्वाखाली चालू आर्थिक वर्षांतील पाचवे द्विमासिक पतधोरण शुक्रवारी जाहीर करण्यात आले. पतधोरण निश्चितीच्या सहा सदस्यीय समितीची बैठक शुक्रवारी संपली. या बैठकीत व्याज दर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, बहुतेक सर्व तज्ज्ञांनी व्याजदर वाढीची अपेक्षा व्यक्त केली होती. ढासळत्या रूपयामुळे झालेल्या चिंताजनक परिस्थितीत व्याजदर वाढवले जातील असा अंदाज होता. तसेच महागाईचा दर वाढत असल्यानेही व्याजदरांमध्ये वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, रिझर्व्ह बँकेने तज्ज्ञांना अनपेक्षित असा निर्णय घेत व्याजदर कायम ठेवले आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेचे पडसाद चलन बाजारात उमटले असून रुपयाचे आणखी अवमूल्यन झाले आहे. आधीच ऐतिहासिक नीचांकावर असलेला भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत 74 ची पातळी शुक्रवारी ओलांडली आहे. या वर्षामध्ये रुपया डॉलरच्या तुलनेत 14 टक्क्यांनी घसरला असून अत्यंत खराब कामगिरी करण्याच्या बाबतीत भारतीय चलन आशियामध्ये आघाडीवर आहे.

मार्चअखेरीस महागाईचा दर 4.5 टक्क्यांच्या आसपास राहील असा अंदाज वर्तवतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रत्यक्षात हा दर आणखी वाढू शकतो असे संकेत दिले आहेत. तसेच, भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ या आर्थिक वर्षात 7.4 टक्क्यांनी होईल असा अंदाजही रिझर्व्ह बँकेने वर्तवला आहे.