रिझव्‍‌र्ह बँकेचे आज पतधोरण

वाढती अन्नधान्य महागाई आणि मंदावलेला विकास यामुळे मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला व्याजदर कपातीची चैतन्यदायी झुळूक दिसेल का, याची स्पष्टता गुरुवारी होणार आहे. पुन्हा सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला अपेक्षित किमान पाव टक्का व्याज दरकपातीची भेट रिझव्‍‌र्ह बँक देईल, अशीही अटकळ आहे.

आर्थिक वर्ष २०१९-२० मधील दुसरे द्विमासिक पतधोरण गुरुवारी दुपापर्यंत जाहीर होणार आहे. यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली गेले दोन दिवस सुरू असलेली पतधोरण समितीची बैठक गुरुवारी संपत आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतरची व्याज दर बदलाबाबतची ही पहिली बैठक आहे.

महागाई दर तूर्त रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहनशील अशा ४ टक्क्यांच्या खाली, ३ टक्क्यांपर्यंत उतरला असला तरी अर्थव्यवस्थेचा वेग ७ टक्क्यांच्या खाली आला आहे. त्याला चालना देण्यासाठी अर्थव्यवस्थेत रोकडसुलभता येण्याच्या दृष्टीने स्वस्तात कर्जपुरवठा उपलब्ध होण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याज दराची अपेक्षा उद्योग क्षेत्रातूनही होत आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वीच्या सलग दोन पतधोरणात प्रत्येकी पाव टक्का दरकपात केली आहे. यंदाही त्यात कपात होण्याची अर्थतज्ज्ञांना अटकळ आहे. चालू एकूण वित्त वर्षांत पाऊण टक्का दरकपात होण्याबाबतचा अंदाजही वित्तसंस्थांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कर्जपुरवठय़ाचे प्रमाण १३ टक्क्यांपर्यंत गेले असले तरी ठेवींवर दिले जाणारे व्याज कमी केले जात आहे.

अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल परिणामाची शक्यता कमीच

व्याज दरकपातीची सार्वत्रिक अपेक्षा असताना, अशा कपातीचा नजीकच्या काळात अर्थव्यवस्थेला हातभार लागण्याची शक्यता कमी असल्याचे मत ‘इंडिया रेटिंग्ज’ने व्यक्त केले आहे. कर्जासाठी मागणी वाढण्याची शक्यता दिसत नसताना, अशी व्याज दरकपात करणे सध्या तरी योग्य ठरणार नाही, असे या पतमानांकन संस्थेचे प्रतिपादन आहे.  आधीच्या दोन कपातीनंतर बँकांनी आपल्या ठेव/कर्ज व्याजदरात अपेक्षित फेरबदल केले नाहीत, याकडे तिने लक्ष वेधले आहे.

बाजाराचा कटाक्ष ‘फेड’वरही!

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हने व्याज दरकपातीचे संकेत दिले आहेत. जागतिक महासत्तेचे पतधोरणदेखील लवकरच जाहीर होणार असून त्यात चीन-अमेरिका व्यापारयुद्धाच्या परिणामांबाबत चिंतेसह, अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना देण्यासाठी व्याजदर कमी केले जाऊ शकतात, असे फेडचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांनी प्रतिपादन केले आहे. त्यांच्या या विधानाचे स्वागत गुरुवारी आशियाई तसेच युरोपीय भांडवली बाजारांनी २ टक्क्यांपर्यंतच्या तेजीसह केले. २०१८ सालात निरंतर वाढीचे धोरण बदलून फेडने २०१९ सालात कपातीकडे कल स्पष्टपणे दर्शविला आहे.  ईदनिमित्त सुट्टीमुळे बुधवारी भारतातील भांडवली बाजारात व्यवहार झाले नाहीत. मात्र गुरुवारच्या व्यवहारात याचे पडसाद उमटू शकतील.