बँका, तत्कालीन सरकार, रिझव्‍‌र्ह बँकेच्या कारभारावर ऊर्जित पटेल यांचे बोट

मुंबई : बँका, सरकार आणि नियंत्रक रिझव्‍‌र्ह बँक यांच्या २०१४ सालापर्यंतच्या अपयशामुळे अनुत्पादक कर्जाच्या गोंधळाची आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम अतिरिक्त भांडवल कमी असण्यात (लो कॅपिटल बफर्स) झाला आहे, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी म्हटले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने वेळीच उपाययोजना करण्यास उशीर केल्याचे त्यांनी यातून निदर्शनास आणले आहे. ‘जैसे थे’ परिस्थितीवर परत जाण्याचा मोह आवरण्याचे आवाहनही त्यांनी सर्व संबंधितांना केले आहे.

देशातील बँकांनी अतिशय जास्त प्रमाणात कर्जे दिली, तर सरकारने याबाबत त्याची भूमिका ‘पूर्णपणे बजावली नाही’, असे पटेल म्हणाले. सरकारशी तीव्र मतभेद झाल्यामुळे गेल्या वर्षी १० डिसेंबरला रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा त्याग केल्यानंतर पटेल यांनी प्रथमच  या विषयावर जाहीर मत व्यक्त केले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने याबाबतीत आधीच पावले उचलायला हवी होती, असे त्यांनी सांगितले.

३ जून रोजी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना पटेल यांनी विशेषत: सरकारी बँकांनी दिलेली मोठय़ा प्रमाणातील अनुत्पादक कर्जे (एनपीए) आणि सध्याचे अतिरिक्त भांडवल ‘फुगवून’ सांगण्यात येत असल्याच्या, तसेच अर्थव्यवस्थेवरील प्रचंड ताण हाताळण्यासाठी ते अपुरे असल्याच्या मुद्दय़ांसह देशाच्या बँकिंग क्षेत्रासमोरील चिंतेच्या विषयांचा ऊहापोह केला.

‘‘ही परिस्थिती कशी निर्माण झाली? यासाठी अनेक घटकांना दोष देता येईल. २०१४ पूर्वी बँका, नियंत्रक आणि सरकार हे सर्व संबंधित त्यांची भूमिका बजावण्यात अपयशी ठरले’’, असे या वेळी पटेल यांनी सांगितले.