विविध मुदत ठेवींवरील व्याजदर कपातीनंतर आता कर्ज स्वस्ताईही; अर्थसंस्थांना यंदा विश्वास
रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी पतधोरण येत्या ५ एप्रिल रोजी जाहीर होत आहे. गेल्या पतधोरणात गव्हर्नर डॉ. राजन यांनी अर्थसंकल्पाची प्रतिक्षा म्हणून व्याजदर स्थिर ठेवले होते. तर आता केंद्र सरकारने विविध मुदत ठेवींवरील व्याजदर कमी केल्याने कर्ज दरदेखील कमी होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या व्याजदर कपातील गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरत असलेल्या महागाई दराचेही सबळ निमित्त आहे.
फेब्रुवारीमधील किरकोळ महागाई निर्देशांक ५.१८ टक्के राहिला आहे. तो रिझवर्ह बँकेच्या सहनशील अशा ५ टक्क्य़ांनजीक आहे. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाही भक्कम बनला आहे.
गेल्या आठवडय़ाच्या अखेरिस बाजारातील व्यवहार संपुष्टात आल्यानंतर सरकारने विविध मुदतठेव योजनांचे दर बाजारानुरुप निश्चित करताना कमी केले होते. त्यानंतर गेल्या दोन दिवसात बाजारात सुटीमुळे व्यवहार होऊ शकले नाहीत. त्याचा परिणाम सोमवारी बाजार सुरू होताच जाणवला.
बुडित कर्जाबाबत बँकांची बैठक
सार्वजनिक बँकांच्या वाढत्या बुडित कर्ज समस्येवर चर्चा करणारी बैठक सोमवारी नवी दिल्लीत पार पडली. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या बैठकीला संबोधित केले. मात्र ही नियमित बैठक असल्याचे नमूद करत त्याबाबतचा तपशील जाहीर करण्यात आला नाही. बँकांना भेडसावत असलेल्या वाढत्या बुडित कर्ज प्रकरणात सध्या महत्त्वाच्या व मोठी थकित रक्कम असलेल्या किंगफिशर एअरलाईन व त्याचे प्रवर्तक विजय मल्या यांच्याविरुद्ध जोरदार कारवाई सुरू आहे. नवे आर्थिक वर्ष सुरू होण्यास १० दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाच मार्च २०१७ अखेर बँकांना त्यांचे बुडित कर्जे निकाली काढण्यास रिझव्‍‌र्ह बँकेने सांगितले आहे. देशातील सार्वजनिक बँकांमधील बुडित कर्जाची रक्कम डिसेंबर २०१५ अखेर ३.६१ लाख कोटी रुपये झाली आहे. वितरित कर्जाच्या तुलनेत हे प्रमाण ७.३० टक्के आहे. तर खासगी बँकांचे हेच प्रमाण २.३६ टक्के आहे.
नोमुरा :
अल्प बचत योजनांमधील सरकारची येत्या तिमाहीकरिता जाहीर केलेली व्याजदर कपात ही सरकार तसेच बँकांकरिता लाभदायी असल्याचे मत नोमुरा या जपानी वित्तसेवा कंपनीने व्यक्त केले आहे. यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण कर्ज व्याजदरात परावर्तित होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. ठेवींवरील कमी व्याजदर दिले गेल्याने बँकांना नफा साधता येईल, असे नमूद करण्यात आले आहे.
डॉएच्च :
रिझव्‍‌र्ह बँक येत्या ५ एप्रिलच्या पतधोरणात पाव टक्का दर कपात करेलच, असा विश्वास व्यक्त करत डॉएच्च या आंतरराष्ट्रीय बँकेने यासाठी कमी होत असलेल्या महागाईचे कारण दिले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने यंदा तब्बल अर्धा टक्का दर कपात केली तर भविष्यात ती आणखी होणार नाही, असे कदाचित सुचविले जाईल, असे निरिक्षण आंतरराष्ट्रीय बँकेने नोंदविले आहे.

५ एप्रिलचे रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण हे नव्या, २०१६-१७ आर्थिक वर्षांतील पहिले पतधोरण असेल. घसरता औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि सावरत असलेली महागाई यामुळे यंदा किमान पाव टक्क्य़ाची दर कपात सर्वच क्षेत्रातून अपेक्षित केली गेली आहे.

वाढत्या धोकादायक स्थितीचे जगासमोर आव्हान आहे. सध्या होत असलेले नवे आंतरराष्ट्रीय करार हे अन्य अर्थव्यवस्थांवर विपरित परिणाम करणारे ठरू शकतात. विशेषत: विकसित राष्ट्रांच्या मध्यवर्ती बँकांची विकसित राष्ट्रांच्या अर्थधोरणांना बाधा आणू शकतात. २००८ पूर्वीचा विकास साध्य करावयाचा असल्यास बँकांच्या कर्जाची नोंद ताळेबंदाबाहेर करणे आवश्यक ठरेल.
– डॉ. रघुराम राजन, गव्हर्नर, रिझव्‍‌र्ह बँक.