सहा टक्के किंमत वाढीचा ‘जेएलएल’चा अंदाज
मुंबई शहर, उपनगर तसेच परिसरातील घरांच्या किमती यंदा पुन्हा वाढणार असल्याची शंका उपस्थित करण्यात आली आहे. यानुसार गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा त्यात सहा टक्क्यांची वाढ अपेक्षित करण्यात आली आहे.
निवासी तसेच व्यापारी स्थावर मालमत्ता क्षेत्रातील सल्लागाराची भूमिका वठविणाऱ्या जॉन्स लॅन्ग लासेलेने (जेएलएल) याबाबतचा अहवाल मांडला आहे. यानुसार मुंबई शहर तसेच उपनगरातील घरांच्या किमती यंदा सहा टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी – २०१५ मध्ये घरांचे दर ३.३ टक्क्यांनी तर त्या आधीच्या वर्षांत – २०१४ मध्ये निवारा ७ टक्क्यांनी महागला होता. जेएलएलने गेल्या वर्षीसाठी अधिक, ६ ते ७ टक्के किंमत वाढीचा अंदाज व्यक्त केला होता.
२००८ च्या आर्थिक मंदीपूर्वी घरांच्या किमती दुहेरी आकडय़ात वाढत होत्या; सध्या तशी स्थिती नसली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यात वाढ होणार असल्याचे जेएलएल इंडियाचे आंतरराष्ट्रीय संचालक रमेश नायर यांनी म्हटले आहे. गेल्या काही कालावधीपासून पडून असलेल्या जागांना यंदा मागणी येण्याबाबतचा विश्वासही नायर यांनी व्यक्त केला आहे.
दक्षिण मध्य मुंबईत घरांचे दर ४.३ तर पूर्व मुंबईत ३.९ टक्क्यांनी वाढण्यासह उत्तर मुंबईत ३.९ व पश्चिम मुंबईत ते ३.५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज याबाबतच्या अहवालात बांधण्यात आला आहे. मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात ठाण्यात जागेचे दर ३ टक्क्यांनी तर नवी मुंबईत ६ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.