वाहनांची इंधन कार्यक्षमता (माइलेज) वाजवीपेक्षा फुगवून सांगणाऱ्या घोटाळ्याची कबुली देणाऱ्या जपानी वाहन निर्मात्या मित्सुबिशी मोटर्सच्या ३४ टक्के भागभांडवलाच्या संपादनासह कंपनीचा ताबा मिळविण्याचा करार निस्सान या दुसऱ्या बडय़ा जपानी कंपनीने गुरुवारी केला. निस्सान मोटर कं.चे अध्यक्ष व मुख्याधिकारी कालरेस घोस्न यांनीमित्सुबिशीचे अध्यक्ष ओसामू मोसुको यांनी निस्सानच्या योकोहामा येथील मुख्यालयात संयुक्त पत्रकार परिषदेत अधिकृतपणे हे जाहीर केले. कंपनीवर मालकीसह अनेक मुद्दय़ांसंबंधाने उभयतांमध्ये वाटाघाटी सुरू असून, सुमारे १.८ अब्ज अमेरिकी डॉलरच्या मोबदल्यात, निस्सानने कंपनीचा बहुतांश भांडवली हिस्सा मिळविल्याचे सांगण्यात येत आहे. मित्सुबिशी आणि निस्सान यांच्या दरम्यान आधीपासून अनेकांगी भागीदारी सुरू होती. ताज्या व्यवहारानंतर मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजचा हिस्सा २० टक्क्यांवर सीमित राहील.