आघाडीची आंतरराष्ट्रीय अमेरिकन एक्स्प्रेस बँकिंग कॉर्पोरेशनवर रिझव्र्ह बँके ने शुक्रवारी नवीन निर्बंध लादले. यानुसार या बँकेसह डायनर्स क्लब इंटरनॅशनल लिमिटेडला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

या निर्बंधांमध्ये उभय वित्तसंस्थांना त्यांची क्रेडिट तसेच डेबिट कार्डही येत्या १ मेपासून वितरित करता येणार नाहीत. विदा साठवणूक नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मध्यवर्ती बँकेने ही कारवाई केली आहे. दोन्ही वित्तसंस्थांच्या सध्या अस्तित्वात असलेल्या ग्राहकांच्या सेवेवर नव्या निर्बंधांचा परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्याच आठवड्यात अमेरिकास्थित सिटी बँकेने भारतातील व्यवसायातून निर्गमन करत असल्याचे जाहीर केले होते. आर्थिक ताळेबंदावर विपरित परिणाम होत असलेल्या सिटी समूहाने भारतासह काही देशांमधून काढता पाय घेण्याचे स्पष्ट केले होते.

देयक पद्धती विदाबाबतच्या साठवणूकविषयक निर्देशांचे दोन्ही वित्तसंस्थांनी रिझव्र्ह बँक च्या विहित कायद्यांन्वये पालन न केल्याने कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. एप्रिल २०१८ मध्ये याबाबतची नियमावली जारी करण्यात आली होती.

वित्त संस्थांनी त्यांच्याकडील विदा माहिती सहा महिन्यांच्या आत भारतातच साठवणूक करण्याविषयीची ही नियमावली आहे. तंत्र पद्धती लेखा परीक्षण अहवालही या वित्तसंस्थांना सादर करण्यात आला आहे.