उणे घाऊक किंमत निर्देशांक उंचावला; किरकोळ महागाई चौथ्या महिन्यातही वधारती
रिझव्‍‌र्ह बेंकेचे लक्ष्य ५ टक्क्य़ांचे आहे.
सोमवारी जाहीर झालेला नोव्हेंबरमधील घाऊक तसेच किरकोळ महागाई दर उंचावताच राहिला आहे. अन्नधान्यांच्या वाढत्या किंमतींमुळे देशावरील वाढत्या महागाईचे संकट अद्याप कायम असल्याचे यातून स्पष्ट झाले.
गेल्या महिन्यातील घाऊक तसेच किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर सोमवारी जाहीर झाला. पैकी घाऊक महागाई ही सलग १३ महिन्यात उणे राहिली असली तरी आधीच्या महिन्याच्या तुलनेत ती मोठय़ा फरकाने वाढली आहे. ऑक्टोबरच्या (-)३.८१ वरून नोव्हेंबरमधील घाऊक महागाई (-)१.९९ टक्क्य़ांवर गेली आहे.
घाऊक किंमत निर्देशांकातील अन्नधान्याची महागाई ही ५.२० टक्क्य़ांपर्यंत वाढली आहे. यामध्ये डाळी, कांदे, भाज्या, बटाटे तसेच मांसाहरी पदार्थाच्या किंमती वाढल्या आहेत. सोबतच इंधन व ऊर्जा तसेच निर्मित वस्तूंच्या महागाईचा दरही वाढला आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेसाठी महत्त्वाचा मानला जाणारा किरकोळ महागाई दरही गेल्या महिन्यात ५.४ टक्क्य़ांपर्यंत वाढला आहे. सलग चौथ्या महिन्यात हा दर वाढताना त्यावरही भाज्या, डाळी, फळे आदींच्या वाढत्या किंमतींचा परिणाम झाल्याचे दिसून येते.
वर्षभरापूर्वी ३.२७ टक्के असलेल्या या दरामध्ये यंदाच्या अन्नधान्यातील ६.०७ टक्के वाढीची भर पडली आहे. यामध्ये डाळी ४६ टक्के तर भाज्या दुपटीने महागल्या आहेत. फळे, मांसाहरी पदार्थ यांची किंमतवाढही किरकोळ महागाईत वाढ नोंदविणारी ठरली आहे.
मध्यवर्ती बँकेने जानेवारी २०१६ पर्यंत महागाईचे ५ टक्क्य़ांचे लक्ष्य निर्धारित केले आहे. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या मंगळवार अखेरच्या बैठकीत व्याजदर पाव टक्क्य़ाची वाढण्याची शक्यता वर्तवितानाच रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी महागाईची चिंता कायम असल्याचे नमूद केले होते. मध्यवर्ती बँकेचे यानंतरची पतधोरण फेब्रुवारीमध्ये होणार असून चालू आर्थिक वर्षांत व्याजदर कपातीची शक्यता कमी आहे.

गव्हर्नर-बँकर अचानक बैठक!
मुंबई : नव्या पतधोरणाला महिन्याचा कालावधी असताना रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सोमवारी निवडक बँकप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत बँकांच्या वाढत्या बुडित कर्जाबद्दल चर्चा करण्यात आल्याचे कळते. बँकांच्या ऋण दर तसेच टप्प्या टप्प्याने कमी करावयाच्या बुडित कर्जाच्या प्रमाणाचे विषय बैठकीत असल्याचे सांगण्यात आले. रिझव्‍‌र्ह बँकेचा नवीन ऋण दर पद्धती आठवडय़ात जाहीर करण्याचा मुहूर्तही चुकला आहे. तसेच मार्च २०१७ पर्यंत बँकांची बुडित कर्जे शून्यावर आणण्याच्या दिशनेही हालचाल मंदावली आहे. या पाश्र्वभूमीवर ही बैठक होती, असे समजते.