जूनमधील किरकोळ महागाईचा दर गेल्या आठ महिन्यातील सर्वोच्च स्थानी विराजमान झाला असून अन्नधान्यासह वस्त्र, निवाराही या कालावधीत महागला आहे.
ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित जूनमधील किरकोळ महागाई दर ५.४० टक्क्य़ांवर गेला आहे. किरकोळ महागाई दर आधीच्या, मे महिन्यात ५.०१ तर वर्षभरापूर्वी, जून २०१४ मध्ये ६.७७ टक्के होता.
एकूण अन्नधान्य महागाई ५.४८ टक्क्य़ांवर गेली आहे. मेमध्ये ती ४.८ टक्के तर वर्षभरापूर्वी ती ७.२ टक्के होती. जूनमध्ये डाळींचे दर २२.२४ टक्क्य़ांनी वाढले आहेत. तर फळे व भाज्यांच्या किंमती अनुक्रमे ३.५१ व ५.३७ टक्क्य़ांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या किंमती ७.१८ टक्क्य़ांनी वधारल्या आहेत. मासांहरी पदार्थाचे दर ७ टक्क्य़ांपर्यंत वाढले आहेत. वस्त्र, पादत्राणे यांच्या किंमतीही जूनमध्ये ६.३४ टक्क्य़ांनी तर निवारा ४.४८ टक्क्य़ांनी महाग झाला आहे. त्याचबरोबर इंधन व ऊर्जा दर ५.९२ टक्क्य़ांपर्यत वाढले आहेत.
मेमधील औद्योगिक उत्पादनाचा दर कमी झाला असतानाच रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर कपातीची आशा उंचावली होती. आता महागाई दर वाढल्याने पुन्हा एकदा त्याबाबत तर्क वितर्क केले जात आहेत.