ऐन दिवाळीच्या तोंडावर खरेदीदारांचा उत्साह द्विगुणित करणारे वृत्त येऊन धडकले आहे. सप्टेंबरमधील ६.४६ टक्के किरकोळ महागाई दर हा गेल्या अडीच वर्षांच्या नीचांकावर ठेपला आहे.
सप्टेंबरमधील किरकोळ महागाई दर १९ महिन्यांच्या तळात येऊन विसावला आहे. विशेष म्हणजे अडीच वर्षांपूर्वीच, जानेवारी २०१२ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक पद्धतीवर मोजमाप करणारा महागाई दर जाहीर करण्याची यंत्रणा अस्तित्वात आली होती.
भाज्यांसह फळांच्या किमती कमी झाल्याने सप्टेंबरमधील महागाई दर ऑगस्टमधील ७.७३ टक्क्य़ांपेक्षा कमी नोंदला गेला आहे. किरकोळ महागाई दरांमध्ये जुलैपासून नरमाई नोंदली जात आहे.
एकूण अन्नधान्याचा दर ऑगस्टच्या ९.३५ टक्क्य़ांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये ७.६७ टक्केझाला आहे. तर वर्षभरापूर्वी याच महिन्यात हा दर दुहेरी आकडय़ात, ११.७५ टक्के होता. किरकोळ महागाई दर विसावल्याने आता मंगळवारी जारी होणाऱ्या सप्टेंबरमधील घाऊक किंमत निर्देशांकावर नजर असेल. ऑगस्टमध्ये हा दर ३.७४ टक्के नोंदला गेला आहे. रिझव्‍‌र्ह बँक वाढत्या महागाईबाबत अधिक चिंताशील आहे. मध्यवर्ती बँकेने जानेवारी २०१५ साठी ८ टक्के व जानेवारी २०१६ साठी ६ टक्के महागाई दराचा अंदाज राखला आहे. वाढत्या महागाईमुळे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सलग चौथ्यांदा स्थिर व्याजदर धोरण अवलंबिले होते.