नवी दिल्ली : अन्नधान्य, फळे, भाज्या, डाळींच्या किमतीतील उतारामुळे किरकोळ किमतींवर आधारित महागाई दर सरलेल्या ऑक्टोबर ३.३१ टक्क्यांवर घसरल्याचे दिसून आले. सोमवारी सायंकाळी जाहीर झालेला ऑक्टोबरमधील हा दर म्हणजे महागाई दराचा गेल्या संपूर्ण वर्षांतील नीचांक स्तर आहे. तसेच कारखानदारीचा उत्पादन दर सरलेल्या सप्टेंबरमध्ये ४.५ टक्के असे गेल्या चार महिन्यांतील सर्वात कमी पातळीवर नोंदला गेला आहे.

केंद्रीय सांख्यिकी संघटनेने अधिकृतपणे जाहीर केलेल्या आकडेवारीत, प्रामुख्याने अन्नधान्यांच्या किमतीतील वाढ ऑक्टोबरमध्ये अवघी ०.८६ टक्केच होती. त्या उलट भाज्या ८.०६ टक्क्यांनी नरमल्या, फळांच्या किमतीतही ०.३५ टक्क्यांची घसरण, तर उच्च प्रथिने घटक असलेल्या जिनसा जसे डाळी, अंडी, दूध आणि संलग्न उत्पादनांच्या किमतीतील घसरणही एकूण महागाई दर थंडावण्याला मदतकारक ठरल्या.

ऑक्टोबर २०१८ मधील ३.३१ टक्क्यांच्या तुलनेत आधीच्या सप्टेंबर महिन्यात महागाई दर ३.७ टक्के होता. तर ऑक्टोबर २०१७ मध्ये हा दर ३.५८ टक्के असा होता. किरकोळ महागाई दराने यापूर्वी सप्टेंबर २०१७ मध्ये ३.२८ टक्क्यांचा तळ गाठला होता.

केवळ इंधन आणि विजेच्या किमतीत झालेल्या ८.५५ टक्क्यांच्या वाढीने ऑक्टोबर २०१८ एकूण महागाई दरात वाढीला हातभार लावल्याचे दिसून आले. आधीच्या सप्टेंबर महिन्यामध्येही इंधन आणि वीज या किंमत घटकांमध्ये ८.४७ टक्क्यांची वाढ दिसून आली होती.

औद्योगिक उत्पादन दर मात्र निराशाजनक

नवी दिल्ली : देशाच्या कारखानदारी क्षेत्राला लागलेली घरघर ही सप्टेंबर महिन्याच्या जाहीर झालेल्या ४.५ टक्क्यांच्या औद्योगिक उत्पादन दराने दाखवून दिली. आधीच्या ऑगस्ट महिन्यांत हा दर ४.६ टक्के असा होता, तर वर्षभरापूर्वी सप्टेंबर २०१७ मध्ये तो ४.१ टक्के अशा भिकार पातळीवर होता. मात्र चालू वर्षांत जून आणि जुलै या महिन्यात हा निर्देशांक अनुक्रमे ६.९ टक्के आणि ६.५ टक्के असा फेरउभारी दर्शविणारा होता. सप्टेंबरमधील औद्योगिक उत्पादन दराच्या घसरगुंडीमागे, मुख्यत: खाणकामक्षेत्राची कामगिरीत न दिसलेली सुधारणा आणि भांडवली वस्तू क्षेत्रालाही अपेक्षित मागणी नसल्याचा परिणाम दिसून येतो. एप्रिल ते सप्टेंबर अशा सहामाहीत औद्योगिक उत्पादन निर्देशांक ५.१ टक्के पातळीवर असून, गेल्या वर्षांच्या याच सहामाही कालावधीत तो अवघा २.६ टक्के इतकाच होता. सप्टेंबर २०१८ मध्ये निर्मिती क्षेत्रातील २३ पैकी १७ उद्योग घटकांनी सकारात्मक वाढ दर्शविली आहे. फर्निचरनिर्मिती उद्योगाने तर या महिन्यात ३२.८ टक्क्यांची दमदार वाढ दर्शविली आहे.