मेमधील दर ६ टक्क्य़ांनजीक

मान्सूनकडे डोळे लावून बसलेल्या ग्राहकांना महागाईने सावध केले आहे. मेमधील किरकोळ महागाई दर ५.७६ टक्क्य़ांवर गेला आहे. भाज्यांसह अन्नधान्यांच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे यंदा महागाईचा आकडा फुगला आहे.
ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित यंदाच्या एप्रिलमधील सुधारित महागाई दर ५.३९ तर वर्षभरापूर्वी, मे २०१५ मध्ये तो ५ टक्के होता.
ताज्या दरामुळे रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर कपातीबाबतच्या आशा मावळल्या आहेत.
यंदाच्या महागाई दरात भाज्यांच्या वाढत्या किंमतीने मोठी भर टाकली आहे. भाज्यांच्या किंमती यंदा तब्बल दुप्पट झाल्या आहेत. त्यांचा दर आधीच्या महिन्यातील ४.८२ टक्क्य़ांवरून १०.७७ टक्क्य़ांवर गेला आहे.
तर एकूण अन्नधान्य महागाई दर महिन्याभरात ६.३२ टक्क्य़ांवरून ७.५५ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. अंडी, मास, डाळी, मासे, दूध आदी चिजवस्तूंच्यी किंमती मेमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात महागाई दर वाढल्याने आता पावसाची भिस्त आगामी दरांवर असेल.