वर्षांच्या मावळतीला महागाईने पुन्हा एकदा डोके वर काढले. गेल्या महिन्यातील किरकोळ महागाई दर हा किरकोळ का वाढत मात्र ५ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. काही खाद्य पदार्थ तसेच फळे, भाज्या यांच्या किंमती वाढल्याने महागाईत वाढ राखली गेली आहे.
नोव्हेंबरमधील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर ४.३८ टक्के होता. महागाई मोजण्याची नवी पद्धत सरकारने जानेवारी २०१२ पासून अंमलात आल्यानंतरची ही सर्वात कमी महागाई नोंदली गेली होती. तर वर्षभरापूर्वी, डिसेंबर २०१३ मध्ये महागाईचा दर ९.८७ टक्के होता.
रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी पतधोरण येत्याच महिन्याच्या सुरुवातीला येऊ घातले आहे. व्याजदरातील कपातीची उद्योजकांपासून थेट केंद्र सरकारनेही अपेक्षा व्यक्त केली आहे. गेल्या पतधोरणात गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी स्थिर दर ठेवले होते. महागाई कमी होताना दिसत असली तरी त्याचा दिर्घकाल परिणाम पाहूनच दर कपात केली जाईल, अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली होती. तर दरम्यान मध्यवर्ती बँकेसाठी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे ६३ पर्यंतचे घसरणेही चिंताजनक बनले होते.