एनएसईचे मोबाईल अ‍ॅप, वेब व्यासपीठ सादर

मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) या भारताच्या आघाडीच्या भांडवली बाजाराने किरकोळ गुंतवणूकदारांना सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी ‘एनएसई गोबीड’ या नवीन मोबाईल अ‍ॅप आणि वेब व्यासपीठाच्या अनावरणाची घोषणा केली आहे. सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी सोमवारी बाजाराच्या मुंबईतील मुख्यालयातील एका कार्यक्रमात या नवीन अ‍ॅपचे पारंपरिक घंटानाद करत अनावरण केले.

‘एनएसई गोबीड’ अ‍ॅप हे राष्ट्रीय शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या सदस्यांच्या नोंदणीकृत गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल आणि सदस्यांना नवीन सदस्यत्व प्राप्त करण्यास मदत करेल. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (युपीआय) आणि ‘इंटरनेट बँकिंग’द्वारे गुंतवणूकदारांना त्यांच्या बँक खात्यातून थेट रक्कम देणेही यामुळे शक्य होणार आहे.

या अ‍ॅपद्वारे किरकोळ गुंतवणूकदार ट्रेझरी बिल्स (टी—बिल्स) मध्ये ९१ दिवसांसाठी, १८२ दिवसांसाठी आणि २६४ दिवसांसाठी आणि विविध सरकारी बाँड्समध्ये १ वर्ष ते ४० वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. गुंतवणूक प्रत्येक आठवडय़ाला एकावेळच्या नोंदणीवर करता येऊ  शकते.  एचडीएफसी सिक्युरीटीजच्या एका ग्राहकाने ‘एनएसई गोबीड’मार्फत पहिली बोली लावली.

सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी म्हणाले की, सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणुकीसाठी ‘एनएसई गोबीड’ या वेब/मोबाईल अ‍ॅप हा भारत डिजिटल पेमेंट्समध्ये प्रतिक्षा बघत असताना एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. भांडवली बाजाराची व्यापकता वाढवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा जास्त वापर आवश्यक आहे. सरकारी रोख्यांमध्ये किरकोळ सहभाग बाजारांना सेबीने बिगर स्पर्धात्मक बोली व्यासपीठ स्थापन करण्यास अनुमती दिल्यावर सुरू झाला आहे.

सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक हा जास्त सुरक्षित पर्याय किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असतो. सरकारी रोखे हे क्रेडीट जोखीममुक्त माध्यम असून पोर्टफोलिओ फेरबदलही देऊ  करतात आणि दीर्घकालीन गुंतवणूक कालावधी देतात.