मुंबई : भांडवली बाजार सेबीने आक्षेप घेतलेल्या विविध थकित कर्जखाते प्रकरणाची स्वतंत्र निवृत्त न्यायमुर्तीमार्फत चौकशी करण्याची तयारी आयसीआयसीआय बँकेने दाखविली आहे. बँकेची यापूर्वीच अंतर्गत चौकशी सुरू आहे.

सुमारे १.३० अब्ज डॉलरच्या गेल्या आठ वर्षांपासून थकित असलेल्या विविध ३१ कर्जखात्यांबाबत भांडवली बाजार नियामक सेबीने देशातील दुसऱ्या मोठय़ा खासगी बँकेची विचारणा केली आहे. यानंतर बँकेने अंतर्गत चौकशीही सुरू केली होती. बँकेच्या थकित कर्जप्रकरणाची आता सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची तयारी सुरू असल्याचे कळते. यासाठी बँकेच्या लेखा समितीला सहकार्यार्थ स्वतंत्र विधी कंपनीचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्यावर विश्वास दर्शविणाऱ्या बँकेच्या संचालक मंडळाने कोचर यांचे अधिकार यानंतर काढून घेतले. बँकेची चौकशी प्रक्रिया होईपर्यंत त्या दैनंदिन कामकाजापासून दूर राहणार आहेत. व्हिडिओकॉनला दिलेल्या विस्तारित कर्जामुळे बँक चर्चेत आहे.

दरम्यान, बँकेची आगामी वार्षिक सर्वसाधारण सभा महिन्याभरासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या १० ऑगस्ट रोजी होणारी  बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आता १२ सप्टेंबर रोजी होईल.

आयडीबीआय बँकेतील हिस्सा वाढीला एलआयसीची मंजुरी

नवी दिल्ली : आयडीबीआय बँक या सरकारी बँकेतील हिस्सा निम्म्यापर्यंत वाढविण्यास देशातील एकमेव सार्वजनिक आयुर्विमा कंपनीच्या संचालक मंडळाने सोमवारी मंजुरी दिली. प्राधान्य समभागाच्या रुपात बँकेतील ५१ टक्केपर्यंतचा हिस्सा भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) खरेदी करण्याच्या प्रस्तावाला विमा कंपनीच्या संचालक मंडळाने मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय अर्थव्यवहार सचिव एस. सी. गर्ग यांनी दिली. या निर्णयाला आता सेबीच्या मान्यतेची गरज आहे. या निर्णयाला विमा नियामक मंडळाने यापूर्वीच परवानगी दिली आहे. महामंडळाचा बँकेत ११ टक्के हिस्सा आहे.

सरकार पीएनबी हाऊसिंग फायनान्समधील हिस्सा विकणार

मुंबई : देशातील दुसरी मोठी सार्वजनिक बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने तिच्या गृह वित्त कंपनीतील हिस्सा कमी करण्याचे पाऊल उचलले आहे. याबाबतच्या प्रक्रियेसाठी बँकेने गुंतवणूक बँकेची नियुक्ती केली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. पीएनबी हाऊसिंग फायनान्समध्ये पंजाब नॅशनल बँकेचा ३२.७९ टक्के हिस्सा आहे. यामध्ये कार्लेन समूहाची ३२ टक्के भागीदारी आहे.