गेल्या सप्ताहाप्रमाणेच चालू आठवड्यातही भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक तेजी-मंदीचे हेलकावे खाण्याची चिन्हे आहेत. अस्थिरतेच्या वातावरणात सेन्सेक्सने गेल्या आठवड्यात ८४९.७४ अंशांचे नुकसान सोसले आहे.

चालू आठवड्यातील पाचपैकी तीनच दिवस बाजारात समभाग खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार आहेत. सोमवारच्या धूलिवंदनानंतर सप्ताहअखेर, शुक्रवारी ‘गुड फ्रायडे’निमित्त बाजारात व्यवहार बंद असतील.  एकूण व्यवहार मंदावलेले असल्याने प्रमुख निर्देशांकांमध्ये  अस्थिर राहण्याची शक्यता अधिक आहे. किंबहुना बाजाराला आता कंपन्यांचे तिमाही वित्तीय निष्कर्षामुळेच स्थैर्य येईल, असा  बाजारतज्ज्ञांचा कयास आहे.

करोनाबाधेची दुसरी लाट आणि समभागांची वरच्या मूल्यावर होणारी नफावसुली यामुळे बाजारात काहीसे अस्थैर्य तूर्त राहणार असून लसीकरणाचा वेग आणि कंपन्यांचे आर्थिक वर्षाच शेवटच्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले की बाजार स्थैर्याकडे वळेल, असे जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे प्रमुख संशोधक विनोद नायर यांनी सांगितले.

सॅम्को सिक्युरिटीजच्या समभाग संशोधन विभागाच्या प्रमुख निराली शाह यांच्या मते, बाजार दखल घेईल अशा कोणत्याही घडामोडी चालू आठवड्यात तरी नाहीत. परिणामी दिशाहिनता आणि अस्थिरता तूर्त तरी कायम राहण्याची चिन्हे आहेत.

चालू आठवड्यात दोन सुट्या आल्याने उर्वरित कालावधीत व्यवहार करताना गुंतवणूकदार विशेषत: जागतिक घडामोडींवर लक्ष केंद्रित करून आगामी दिशा ठरवतील अशी चिन्हे आहेत, असे मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सव्र्हिसेसच्या किरकोळ व्यवसाय विभागाचे संशोधकप्रमुख सिद्धार्थ खेमका म्हणाले.

देशातील करोनाबाधितांची संख्या त्याचबरोबर अमेरिकेतील रोख्यांवरील व्याजातील बदल यावर नजर ठेवत गुंतवणूकदार येथील बाजाराची दिशा निश्चित करण्याची चिन्हे असल्याचे चॉइस ब्रोकिंगचे संशोधक विश्लेषक सतीश कुमार यांनी सांगितले.