दुसऱ्या तिमाहीतील निव्वळ नफ्यात मात्र ६.१ टक्के वाढ

चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा तसेच एकूण महसुलात वाढ नोंदविणाऱ्या इन्फोसिसने आगामी कालावधीतील व्यवसाय चित्राबाबत मात्र साशंकता व्यक्त केली आहे. यापूर्वी १०.५ ते १२ टक्के महसुलाची अपेक्षा वर्तविणाऱ्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीने एकूण चालू आर्थिक वर्षांची महसूल वाढ मात्र अवघी ८ ते ९ टक्के असेल, असे अंदाजित केले आहे.

टाटा समूहातील टीसीएसने चलन अस्थिरचा फटका बसलेले वित्तीय निष्कर्ष जाहीर केल्यानंतर इन्फोसिसचे चालू आर्थिक वर्षांतील जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक निकाल शुक्रवारी भांडवली बाजार व्यवहारा दरम्यानच स्पष्ट झाले.

यामध्ये इन्फोसिसने वार्षिक तुलनेत ६.१ टक्के वाढीसह ३,६०६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला. तर या कालावधीतील कंपनीचे महसुली उत्पन्न १०.७ टक्क्यांनी वाढून १७,३१० कोटी रुपये झाले आहे.

कंपनीने २०१६-१७ मधील महसुली वाढ १०.५ ते १२ टक्के असेल, असे पहिल्या तिमाहीदरम्यान नमूद केले होते. शुक्रवारी मात्र दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना ही वाढ कमी अंदाजित करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षांसाठी ती १० टक्क्यांखाली, ८ ते ९ टक्के असेल, असे आता नमूद करण्यात आले आहे. एकूण भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या वाढीपेक्षाही ती कमी आहे. पहिल्या अर्ध वित्त वर्षांचा कंपनीचा प्रवास पाहता संपूर्ण वर्षभरासाठी तो अनिश्चित असेल, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी शुक्रवारी म्हटले. दरम्यान, घटलेल्या महसूली अंदाजाचा परिणाम सेन्सेक्समधील इन्फोसिसच्या समभागांवर २.३४ टक्के घसरणीच्या रूपात झाला. तर टीसीएसचा समभाग १.६१ टक्क्याने वाढला.