प्रयोगशाळा अथवा वैद्यकीय चाचणी केंद्रांमध्ये केलेले पूर्वीचे निदान संकलित रूपात पाहण्याची सोय या क्षेत्रातील आघाडीच्या एसआरएल डायग्नॉस्टिक्सने अशी केली असून माहिती तंत्रज्ञानावर आधारीत या सुविधेसाठी कोणीही नोंदणी करू शकेल.
अनेक आजारांबाबत उपचार सुरू होण्यापूर्वी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रुग्णाला रोग निदान चाचणी करावी लागते. अशा वेळी रुग्ण प्रत्येक वेळी ती ती चाचणी भिन्न कालावधीत करतो. अनेकदा ती निरनिराळ्या निदान केंद्रांमध्येही होते. मात्र एसआरएल डायग्नॉस्टिक्समध्ये रुग्णाच्या पूर्वी केलेल्या सर्व निदानांची माहितीच एका यंत्रणेत साठवून ठेवण्यात येत असून ती संबंधित रुग्णाला हवी तेव्हा उपलब्ध केली जाणार आहे.
एसआरएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव वशिष्ठ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, कंपनीच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रुग्णांना ही सेवा घेता येईल. यामध्ये रुग्णाने आधी केलेल्या सर्व चाचण्या त्यांच्या निदान, निष्कर्षांसह पाहता येतील. या चाचण्यांचा अंदाज व माहिती घेऊन रुग्णालाही पुढील उपचारासाठी योग्य पावले उचलता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारतातील रोग निदान संघटित उद्योग हा ५ अब्ज डॉलरचा असून तो वार्षिक १५ टक्के दराने वाढतो आहे. देशाच्या रोग निदान क्षेत्रात ९० टक्के केंद्रे तसेच प्रयोगशाळा या असंघटित कंपन्या, संस्था यांच्या आहेत. १० टक्के संघटितांमध्ये १,००० व्यावसायिक असतील तर त्यांच्या प्रयोगशाळा या एक लाखाच्या घरात असतील. मानवी शरीराच्या विविध ४ हजारांहून अधिक वैद्यकीय चाचण्या होतात. मान्यता आदींसाठी प्रयोगशाळांचा तसा ‘एनएबीएल’ व ‘सीएबी’ दोन प्रमुख संस्थांशी संबंध येत असला तरी असंघटित प्रयोगशाळांवर, त्यांच्या कार्यपद्धतीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याची तक्रार आहे.
वशिष्ठ यांनीही या व्यवसायावर नियामकाचे नियंत्रण असण्याची गरज प्रतिपादित केली. प्रत्येकाच्या जीवाशी निगडित ही सेवा योग्य संशोधन व नेमक्या निदानासाठी होण्यासाठी या क्षेत्रातील छोटे-बडय़ा व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाखाली असे नियंत्रण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. एसआरएल डायगोनिस्टिक्समध्ये ७०० डॉक्टर, संशोधकांसह एकूण कर्मचारी संख्या ६,००० हून अधिक आहे. कंपनी देशभरातील आपल्या २७० प्रयोगशाळांमधून केंद्राद्वारे दिवसाला एक लाख चाचण्या करते. तर कंपनीचे ५,३०० हून अधिक संकलन केंद्रे आहेत. विविध राज्यांमध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये केंद्र स्थापन करण्याचा तिचा बेत आहे.