बडय़ा शहरांमध्ये प्रवासासाठी वापरात येणाऱ्या बस सेवा, उपनगरीय रेल्वे, मोनो-मेट्रो रेल्वे म्हणजे नागरिकांच्या जीवनवाहिन्याच बनल्या आहेत. अशा सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक सेवा एका सामाईक मंचावर एकत्र आणणारे मोबाइल अ‍ॅप ‘रिडलर (Ridlr)’ या नावाने सुरू झाले आहे. दैनंदिन वेळापत्रक, त्यात होणारे अद्ययावत फेरबदल या नियमित माहितीसह, वेगवेगळ्या वाहतूक प्रकारात प्रवासासाठी लागणाऱ्या वेळांची तुलना करून सुयोग्य प्रवासाचे मार्ग ठरविण्याचा पर्यायही ‘रिडलर’ प्रदान करते. अँड्रॉइड कार्यप्रणालीच्या मोबाइल फोनधारकांना हे अ‍ॅप मुक्तपणे व विनामोबदला डाऊनलोड करता येईल.
मुंबईस्थित बर्ड्स आय सिस्टीम्स प्रा. लि.ने हे अ‍ॅप विकसित केले आहे. प्रारंभी महामुंबई आणि पुणे ही दोन महानगरांमधील प्रवाशांना उपयुक्त ठरेल असे बेस्ट, एनएमएमटी, टीएमटी बस सेवांचे वेळापत्रक व मार्ग, उपनगरी रेल्वे, मेट्रो व मोनोरेलच्या वेळा या अ‍ॅपमध्ये सामावण्यात आल्या आहेत. लवकरच दिल्ली-एनसीआर, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांचा समावेश केला जाणार आहे.