तेल विपणन कंपन्यांनी बुधवारी केलेल्या दरवाढीने, पेट्रोलच्या किमतीने मुंबईत लिटरमागे ९१.०७ रुपये असा विक्रमी स्तर गाठला, तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्य़ांत हा दर ९२ ते ९३ रुपयांच्या घरात पोहोचला. डिझेलच्या किमतीनेही मुंबईत  लिटरमागे ८१.४९ रुपयांचा सार्वकालिक उच्चांक नोंदविला आहे. सप्टेंबर २०१८ नंतरचा हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा उच्चांकी स्तर आहे.

तेलकंपन्यांकडून पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर, बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या किमती लिटरमागे २५ पैशांनी वाढविण्यात आल्या. त्याआधी ६ डिसेंबर २०२० पर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सलगपणे सुरू असलेली वाढीची तीव्रता पाहता, पेट्रोलच्या किमती शंभरी गाठतील असे चित्र निर्माण झाले होते. तथापि, त्यानंतर महिनाभराच्या विश्रांतीनंतर, नववर्षांत ६ जानेवारीपासून तेलकंपन्यांकडून पुन्हा दरवाढ सुरू झाली. तेव्हापासून तीनदा झालेल्या दरवाढीमुळे पेट्रोलच्या किमती ४९ पैसे, तर डिझेलच्या किमती ५१ पैशांनी वाढल्या आहेत.

बुधवारच्या दरवाढीनंतर, महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्य़ांत पेट्रोलच्या किमती ९३  रुपयांच्या घरात पोहोचल्या असून, नांदेड आणि परभणीत त्या राज्यात सर्वाधिक म्हणजे प्रति लिटर ९३.३४ रुपये आणि ९३.४५ रुपये अशा अनुक्रमे होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमती कैक महिन्यांनंतर पहिल्यांदाच आता प्रति पिंप ५० डॉलरच्या पल्याड गेल्या आहेत.

पेट्रोल, डिझेल हे अद्याप देशस्तरावर एकसामाईक असणाऱ्या वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीच्या कक्षेबाहेर आहेत. राज्य व स्थानिक स्तरावरील विक्री कर आणि मूल्यवर्धित करांचे दर वेगवेगळे असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमतीही राज्यवार आणि जिल्हावारही वेगवेगळ्या आहेत.

उत्पादन शुल्कवाढीचा भार

चालू आर्थिक वर्षांत, मे २०२० पासून पेट्रोलच्या किमती लिटरमागे १४.७७ रुपयांनी, तर डिझेलच्या किमती प्रति लिटर १२.३४ रुपयांनी वाढल्याचे तेलकंपन्यांच्या किंमतवाढीसंबंधीच्या अधिसूचनांवरून दिसते. या काळात केंद्र सरकारने पेट्रोलवर प्रति लिटर १३ रुपये, तर डिझेलवर १५ रुपये उत्पादन शुल्क वाढविले. याव्यतिरिक्त राज्य सरकारकडून मे महिन्यात पेट्रोल-डिझेलवरील अधिभारात लिटरमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली. परिणामी, महाराष्ट्रात पेट्रोलवर लिटरमागे १०.१२ रुपये आणि डिझेलवर तीन रुपये अधिभार वसूल केला जातो. शिवाय अनुक्रमे २६ टक्के आणि २४ टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) हे सर्व घटक राज्यात इंधनाच्या किमतीत भर घालत आहेत.