काटकसर म्हणून खाद्यपदार्थ, आरोग्यावरील खर्चाला कात्री; स्टेट बँकेच्या अहवालाचे निरीक्षण

मुंबई : इंधनदरांनी शंभरी पार केली असल्याने किराणा सामानाच्या वस्तू, आरोग्यावरील उपचार तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू यावरील खर्च कमी करण्याची नामुष्की सामान्य ग्राहकांवर ओढवली आहे. स्टेट बँकेच्या संशोधन अहवालाचे हे निरीक्षण आहे.

देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल तसेच डिझेलच्या किमतीही प्रति लिटर १०० रुपयांपुढे गेल्या आहेत. प्रत्येक लिटरमागे जवळपास निम्मी रक्कम विविध करांच्या रूपात केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होते.

स्टेट बँकेचे समूह मुख्य अर्थतज्ज्ञ सौम्यकांती घोष यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढल्याने येथेही पेट्रोल तसेच डिझेलचे दर वाढू लागले. त्या आधी आंतरराष्ट्रीय किमती कमी असतानाही इंधनाचे दर खाली आले नाहीत. निदान आता तरी सरकारने इंधनावरील करांचा बोजा कमी करून जनसामान्यांना दिलासा दावा असेही घोष म्हणाले.

बदलत्या कालावधीत ग्राहकांचा खरेदी कल बदलला असल्याचे  अहवालाने केले आहे. इंधनावरील वाढत्या खर्चामुळे प्रसंगी ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तू, खाद्यपदार्थ तसेच सेवेवरील खर्च कमी करावा लागल्याचेही म्हटले आहे.

किराणा वस्तू, औषध तसेच उपचारावरील खर्च व उपभोग कमी झाल्याचाही या अहवालाचा दावा आहे. ग्राहकांचा इंधनावरील वाढता खर्च महागाईवर विपरीत परिणाम करणारा असून महागाईचा दर रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहनशील पातळीपुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

इंधनाच्या किमतीत १० टक्के वाढ झाल्यास महागाईचा दर अध्र्या टक्क्याने वाढू शकतो. त्यामुळे कर कपातीच्या रूपातून इंधनदरात तातडीने कपात आवश्यक असल्याचे अहवालाने स्पष्ट केले आहे. अन्नधान्याच्या किंमतींमध्ये काहीसा उतार अनुभवला जात असला तरी अन्य वस्तूंच्या किमती वाढत असल्याचेही घोष यांनी नमूद केले.

करोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेदरम्यान बँकांतील ठेवी मोडण्याचे प्रमाणही वाढल्याचे घोष यांनी अहवालात म्हटले आहे. यंदाच्या मेच्या तुलनेत जूनमध्ये बंदर मालवाहतूक, रेल्वे वाहतूक, स्टील मागणी कमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे.