बदलते हवामान आणि वाढत्या तापमानामुळे मेहनतीच्या कामांचे तास घटतील, जे पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी जोखमीचे ठरेल. २०३० सालापर्यंत भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीला त्यामुळे २०० अब्ज अमेरिकी डॉलरचा खड्डा पाडणारा परिणाम दिसू शकेल, असे अंदाजण्यात येत आहे.

सध्याच्या तुलनेत दिवसा उन्हं डोक्यावर आल्यावर काम करणे मजुरांसाठी असह्य़ ठरेल आणि त्यांच्या श्रमतासात अंदाजे १५ टक्क्यांची घट होईल, असा कयास मॅकिन्सी ग्लोबल इन्स्टिटय़ूटने अभ्यास अहवालात व्यक्त केला आहे. भर उन्हात केल्या जाणाऱ्या कामामुळे साधलेल्या उत्पादनाचे २०१७ सालच्या भारताच्या जीडीपीत निम्मे योगदान आहे. एकूण श्रमशक्तीपैकी ७५ टक्के म्हणजे ३८ कोटी मजूर अशा प्रकारच्या रोजगारावर अवलंबून असल्याचे मॅकिन्सीचा हा अहवाल सांगतो.

तापमानात वाढ होत राहिली तर न सोसवणारे ऊन आणि आद्र्रता काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम करेल आणि त्यायोगे २०३० सालापर्यंत भारताच्या जीडीपीवर अडीच ते साडेचार टक्क्य़ांपर्यंत घाव घातला जाईल. अर्थात १५० ते २५० अब्ज अमेरिकी डॉलरचे अर्थव्यवस्थेला नुकसान सोसावे लागेल.

अहवालात या समस्येचे समाधान म्हणून भारतात बाह्य़ स्वरूपाच्या कामांसाठी कामगाराच्या तासांमध्ये बदल करावे लागतील. शहरांमध्ये तापमान व्यवस्थापनाचे प्रयत्न वाढवावे लागतील. शिवाय उच्च जोखीम असणाऱ्या कामांमधून भांडवल आणि श्रमशक्तीच्या स्थलांतरणाचा विचार करावा लागेल.