नवी दिल्ली : कोणत्याही बडय़ा वित्तीय संस्थेच्या कोसळण्याचे देशाच्या अर्थव्यवस्थेला विपरीत परिणाम सोसावे लागतात आणि भारतीय वित्तीय क्षेत्रही सध्या अशा साथीच्या आजाराच्या प्रादुर्भावाच्या धोक्याला सामोरा जात आहे, असे निरीक्षण जागतिक पतमानांकन संस्था ‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज’ने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात नोंदविले आहे. उल्लेखनीय म्हणजे ‘फिच’ या पतमानांकन संस्थेने मंगळवारी देशाच्या पत-व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करताना, त्यातून बँकांचे भांडवली दुर्भिक्ष बळावण्याचा धोका असल्याचे मत नोंदविले आहे.

एका बँक अथवा वित्तीय कंपनीच्या कोसळण्याचे परिणाम हे अन्य संलग्न बँका व वित्तीय कंपन्यांवर, देयकांवर, पत-उपलब्धतेवर तसेच एकंदरीत अर्थव्यवस्थेच्या वाढीलाही प्रभावित करणारे असतात, अशी ‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज’ने या अहवालात मांडणी केली आहे.

एस अँड पीच्या पतविषयक विश्लेषक गीता चुग यांच्या मते, भारतातील वित्तीय कंपन्या या देशातील सर्वात मोठय़ा कर्जदारही आहेत. त्यांना झालेला बहुतांश पतपुरवठा हा बँकांमार्फत झाला आहे. त्यामुळे कोणत्याही बडय़ा बँकेतर वित्तीय कंपनी अथवा गृहवित्त कंपनीवर संकट कोसळले तर त्याचा फटका कर्जदात्या बँकांनाही स्वाभाविकपणे बसणार. याहून अधिक मोठा धोका म्हणजे यातून या संपूर्ण क्षेत्राला वित्तपुरवठय़ाचा ओघही आटण्याचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

संकटात सापडलेल्या ‘आयएल अँड एफएस’ या बँकेतर वित्तीय कंपनीकडे निर्देश करीत, त्या परिणामी भारतातील पतविषयक स्थिती खूपच नाजूक बनली असल्याचे एस अँड पीच्या अहवालाने निरीक्षण नोंदविले आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहता, सरकारने वित्तीय व्यवस्थेच्या दृष्टीने मोलाच्या असलेल्या संस्था निश्चित करून त्यांना विद्यमान संकटातून तारून नेणारे पाठबळ द्यायला हवे. हे पाठबळ थेट वित्तीय कंपन्यांपेक्षा बँकांनाच दिले जायला हवे, असेही या अहवालाने सुचविले आहे.

सध्याच्या स्थितीच्या परिणामी कोणतीही बँक संकटात सापडली तर जोखमीची व्याप्ती खूप वाढू शकेल. देशाची पतविषयक प्रणाली अशक्त होऊन त्याचा सबंध अर्थव्यवस्थेला अपाय होऊ देण्यापेक्षा सरकारने बँकेला तारणारा तुलनेने स्वस्त पर्याय निवडणे निश्चित श्रेयस्कर ठरेल, असे या अहवालाने नमूद केले आहे.

तथापि, कमजोर आणि अरिष्टग्रस्त वित्तीय कंपन्यांसंबंधाने लवकरात लवकर तोडगा काढला जाईल, त्याच्या संसर्गापासून बँकिंग व्यवस्थेला वाचविले जाईल, असा विश्वासही जागतिक पतमानांकन संस्थेने व्यक्त केला आहे. यापूर्वी ग्लोबल ट्रस्ट बँक, नेदुंगाडी बँक, युनायटेड वेस्टर्न बँक, बँक ऑफ राजस्थान आणि सांगली बँक आदी प्रकरणी तत्परतेने कृती केली जाऊन, इतरांना संसर्ग होण्याआधीचा आजाराचा बंदोबस्त केला गेला आहे, याचा या अहवालात उल्लेख केला गेला आहे.

अफवा पसरविणाऱ्यांविरोधात लक्ष्मी विलास बँकेची तक्रार

मुंबई : बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत अफवा पसरविल्याप्रकरणी खासगी क्षेत्रातील लक्ष्मी विलास बँकेने तीन फेसबुक खात्यांविरुद्ध चेन्नई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.

लक्ष्मी विलास बँकेच्या काही शाखा व एटीएम बंद झाल्याबाबत संबंधित तीन फेसबुक खात्यांवरून अफवा पसरविण्यात आल्यानंतर बँकेकडे खातेदार, ठेवीदारांकडून मोठय़ा संख्येने विचारणा होऊ लागली. अखेर बँकेने सायबर सेलकडे तक्रार नोंदविली.

अशीच बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत अफवा पसरविल्याबद्दल यापूर्वी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने पुणे पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली आहे.

दक्षिणेत मुख्यालय असलेल्या लक्ष्मी विलास बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. दरम्यान रिझव्‍‌र्ह बँकेने तिच्याबरोबर होणारे इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सचे विलीनीकरणही रद्द केले.