15 December 2017

News Flash

रोबो सल्लागार : भांडवली व्यवहाराचे नवे युग

भांडवली बाजारात वेळ ही अमूल्य असते.

बी. गोपकुमार | Updated: August 1, 2017 1:16 AM

रोबोट्सवर चालणारे मोबाइलवरचे पर्यायी व्यवहार अ‍ॅप विविध रिअल टाइम मार्केट डेटा स्कॅनर्स पुरवतात. यामुळे बाजाराचा कल ओळखून योग्य पर्यायी योजना निवडण्यास मदत मिळते. आजकाल जेथे प्रत्येक जण ऑनलाइन आहे तेथे यश संपादन करण्यासाठी नवीन योजना व दृष्टिकोन यांची गरज आहे.

भांडवली बाजारात वेळ ही अमूल्य असते. गुंतवणूकदार जरी बाजारातील व्यवहारासाठी अनुकूल झाले असले तरीही आकर्षक संधींचा हस्तलिखित लेखाजोखा बाळगण्यास, माहिती नमूद करण्यास व व्यवहार करण्यास लागणारा प्रत्यक्ष वेळ बरेचदा नफ्यावर प्रतिकूल परिणाम करतो आणि येथेच स्वयंचलित प्रणाली किंवा रोबोट्स कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणतात.

भांडवली बाजाराच्या नव्या युगाचे संकेत देताना वैशिष्टय़पूर्ण रितीने तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या रुपातील रोबोट्सने व्यवहार सुधारले आहे व काही प्रचंड यशस्वी कलकरिता ते अविरत कार्यरत आहेत. गुंतवणूकदार आता रुबाबात त्यांच्या स्मार्टफोन्सवरून आरामदायक व्यवहार करत आहेत आणि बरेचदा संस्थांना परवडणाऱ्या वेगाने हे होत आहे.

दर सेकंदाला २५,००० पेक्षा अधिक करार व ५,००० सिक्युरिटीज स्कॅन करून आकर्षक थेट कल ओळखणाऱ्या रोबोट्सची पूर्ण मदत मिळाल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा फरक जाणवत आहे.

मोबाईल अ‍ॅप्स २.० आता उपलब्ध आहे. व्यवहार करणाऱ्यांना बाजाराच्या घडामोडींवर एका सेकंदापेक्षाही कमी वेळात व महत्वाचे म्हणजे फक्त एका स्वाइपने प्रतिक्रिया द्यायची असते. संशोधनाचे लांबलचक अहवाल आता मागे पडले आहेत. कारण व्यवहारकर्त्यांना यशस्वी व्यवहाराच्या संकल्पना व योजना सहज उपलब्ध हव्या असतात. त्या सुरक्षित पद्धतीने व अतिशय वेगाने अमलात आणल्या जाऊ शकतात. रोबोट अनॅलिटीक्सच्या जगात प्रवेश करणे आता महत्त्वाचे ठरले आहे.

रोबोट्सवर चालणारे मोबाईलवरचे पर्यायी व्यवहार अ‍ॅप विविध रिअल टाइम मार्केट डेटा स्कॅनर्स पुरवतात. यामुळे बाजाराचा कल ओळखून योग्य पर्यायी योजना निवडण्यास मदत मिळते. हे रोबो अनॅलिटीक्स आणि अत्याधुनिक तांत्रिक आलेखाच्या साहाय्याने केले जाते. ते अत्याधुनिक गुंतवणूक तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या अंतर्दृष्टीमधून निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पर्यायी व्यवहाराचा भारतीय बाजारात जलद गतीने विस्तार झाला आहे. एका अनुमानानुसार, पर्यायी व्यवहाराचा दररोजच्या मुख्य विनिमयात ३/४ पेक्षा जास्त सहभाग आहे.

हा उद्योग तंत्रज्ञानाला अनुकूल वृत्ती जोपासत आहे आणि फक्त दलाली मिळवण्यावर आता त्यांचा भर नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या शक्तीवर आता विजेत्यांची पारख केली जाणार आहे. दलाली उद्योग व व्यापारी या दोघांनीही इंटरनेट आणि मोबिलिटीचे अभूतपूर्व स्वागत केले आहे. एकूण डेरिव्हेटीव्ह व्हॉल्युमचा ६० टक्कय़ांपेक्षा जास्त भाग ऑनलाईन आहे. मोबाइलद्वारे होणारे व्यवहार हे तिप्पट वाढेल, असा अंदाज आहे आणि ते ९० टक्कय़ांपेक्षा जास्त भाग व्यापेल.

मानवी मेंदूची क्षमता पाहता एक गुंतवणूकदार फक्त ठराविक माहितीच लक्षात ठेवू शकतो. भांडवली बाजारामध्ये प्रत्येक मिनिटाला काही टेराबाईट्स एवढा डेटा माहितीच्या रुपात बदलत असतो. एक रचना निश्चित करण्यासाठी जुन्या पद्धतींचा अवलंब करणारे व्यापारी क्लिष्ट अशा एक्सेलशीट्स वापरतात आणि स्वत: व्यवहाराच्या शक्यता पडताळतात. यामुळे ते प्रत्यक्ष व्यवहारांपासून दूर जातात तसेच शेकडो ओळी आणि रकाने पडद्यावर सतत वर—खाली होत असल्यामुळे ही पद्धत कंटाळवाणी ठरते.

रोबोटसाठी हे सर्व काम अगदी सोपे आहे. एक रोबोट महत्त्वाच्या निर्देशांकांसाठी बाजाराचे पूर्वनियोजित अनुमान काढून त्या माहितीवर प्रक्रिया करू शकतो व आधुनिक तांत्रिक आलेखाच्या साहाय्याने या माहितीला पूरक ठरतो. सहज उपलब्ध असलेल्या या सर्व कार्यपद्धतीच्या ताकदीची फक्त कल्पना करा. तुम्ही नेहमीच फायदेशीर व्यवहारापासून फक्त एका टॅपच्या अंतरावर आहात!

आजकाल जेथे प्रत्येक जण ऑनलाईन आहे तेथे यश संपादन करण्यासाठी नवीन योजना व दृष्टिकोन यांची गरज आहे. याद्वारे अग्रस्थान प्राप्त करता येईल. रोबोट—अनॅलिटीक्स हे रिअल—टाईम स्कॅनर्स उपलब्ध करून देते ज्यामुळे व्यापाऱ्यांना बाजारातील चढ—उतार, किमतीतील कल, सक्षम आणि दुबळे पर्याय, मंदीच्या योजना, आयव्ही स्कॅनर्स आणि तटस्थ योजना अशा विविध निकषांवर आधारित समभागांची यादी मिळते. हे म्हणजे तुमच्याकडे तुमचा स्वत:चा व्यावसायिक तज्ज्ञ असल्यासारखे आहे आणि तेही मोबाइल फोनच्या स्क्रिनवर!

रोबोटवर आधारित अ‍ॅप्समुळे पैसे भरणे व निधी गोळा करणे सुखकर होते. दिवसेंदिवस प्रसिद्ध होणारे ‘यूनिफाईड पेमेंट इंटरफेस’ अर्थात यूपीआय हा व्यवहार मंच व मोबाइल अ‍ॅप्सना जोडले गेल्यामुळे वापरकर्ते आता बहुपातळीवर प्रमाणीकरण, व्यवहारातील रकमेवरील निर्बंध आणि वेळेवरील मर्यादा अशा जटिल गोष्टींपासून सुटका करून घेऊ  शकतात. यामुळे इक्विटी, कमोडिटी आणि करन्सीसारख्या विविध बाजारामध्ये व्यवहार करणे अधिक सोपे होते. आधुनिक प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेमुळे वापरकर्त्यांना एक सुरक्षित व अखंड डिजिटल पेमेंट अनुभव मिळतो.

निष्कर्ष : वैशिटय़पूर्ण तंत्रज्ञान हे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी अनुकूल बदल घेऊन आले आहे. आर्थिकदृष्टय़ा सक्षम गुंतवणूकदारांपुढे वेळ आणि अंमलबजावणीच्या बाबतीत मागे राहतात त्यांच्यासाठी हे फायद्याचे आहे. हे सर्व पर्यायी बाजारातील व्यवहाराच्या वाढता कल यामुळे विकसित होत आहे. शक्तिशाली रोबो—अनॅलिटीक्स आणि मोबाइलवरील व्यवहारामधील सहजता यामुळे सक्षम व दुर्बल घटकांतील दरी दूर होऊन समानता निर्माण झाली आहे.

– बी. गोपकुमार

लेखक रिलायन्स सिक्युरिटीजचे  कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

First Published on August 1, 2017 1:16 am

Web Title: robo advisor for capital transactions