गुंतवणुकीचा ऑगस्टमध्ये नक्त ओघ

मुंबई : जगभरात लोकप्रिय असलेल्या परंतु भारतात गुंतवणूकदारांनी पाठ फिरविलेल्या सोने गुंतवणुकीतील सुरक्षित मानला जाणारा पर्याय ‘गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ)’मध्ये सरलेल्या ऑगस्ट महिन्यात १४५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा नक्त ओघ दिसून आला. मागील नऊ महिन्यांतील हा अपवादात्मक प्रसंग असून, गुंतवणुकीपेक्षा निर्गुतवणूक या फंडाच्या वाटय़ाला गेल्या काही महिन्यांत आली आहे.

जागतिक अर्थ-अनिश्चिततेपोटी, सुरक्षिततेच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांनी शाश्वत मूल्य असलेल्या सोन्याकडे पैसा वळविला आहे, त्याचा प्रत्यय भारतातही येत आहे. सोन्याच्या वाढलेल्या किमती आणि कमजोर रुपया यामुळे हा गुंतवणुकीचा पर्याय सध्या आकर्षक बनल्याचाही हा परिणाम आहे.

गेल्या वर्षी म्हणजे ऑगस्ट २०१८ मध्ये गोल्ड ईटीएफ फंडातून ४५ कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढून घेतले होते, तर म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना -‘अ‍ॅम्फी’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट २०१९ मध्ये १४५.२९ कोटी रुपयांची या फंडांमध्ये गुंतवणूक आली. यापूर्वी नोव्हेंबर २०१८ मध्ये गोल्ड ईटीएफ फंडात १० कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती. त्यानंतर नऊ महिन्यांत निरंतर निर्गुतवणूक सुरू आहे. जुलै २०१९ मध्येही या फंडांतून १७.६६ कोटी रुपये काढले गेले.

ऑगस्टअखेरीस सोन्याच्या किमती  विक्रमी ४०,००० रुपयांच्या पातळीवर गेल्या. त्यामुळे एक मालमत्ता प्रकार म्हणून सोन्याला गुंतवणूकदारवर्गात पुन्हा झळाळी आलेली दिसते. तथापि कारण गुंतवणुकीचा हा ओघ सातत्यपूर्ण असल्याचे जोवर दिसत नाही, तोवर सोन्याबद्दल गुंतवणूकदारांच्या भावना बदलल्या असल्याचे सांगता येणार नाही, असे मॉर्निस्टार इंडियाचे संशोधन संचालक कौस्तुभ बेलापूरकर यांनी सांगितले. म्युच्युअल फंड गुंतवणुकीची लोकप्रियता जोरावर असताना, वर्ष २०१८ मध्ये गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफ फंडातून ५७१ कोटी रुपये काढून घेतले. हे निर्गुतवणुकीचे सलग सहावे वर्ष होते. २०१२ सालात गोल्ड ईटीएफ फंडांमध्ये वार्षिक १,८२६ कोटी रुपयांचा नक्त ओघ होता. डिसेंबर २०१२ मध्ये ४७४ कोटी रुपये या फंडांमध्ये गुंतविले गेले होते, त्यानंतर सरलेला ऑगस्ट हा दुसऱ्या मोठय़ा गुंतवणुकीचा महिना आहे.