मुंबई : पीएमसी बँकेवर मंगळवारी आलेल्या अकस्मात र्निबधानंतर, काही सरकारी बँका बंद होण्याच्या समाजमाध्यमांवरील अफवांनी बुधवारी जनसामान्य खातेदारांमधील धाकधुक आणखीच वाढवली. या प्रकरणी खुद्द रिझव्‍‌र्ह बँकेने ‘अशा कोणत्याही बँका बंद होणार नसल्याचे’ स्पष्ट करणारा खुलासा सायंकाळी केला.

आर्थिक अनियमिततेमुळे रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी अर्थात पीएमसी बँकेवर अकस्मात आर्थिक निर्बंध लादले. बुधवारी या प्रकरणाचे सूत्र पकडत,  समाजमाध्यमांवर नऊ सरकारी बँका कायमच्या बंद होण्याची अफवेने जोम धरला. अशा बँकांमध्ये ज्यांचे खाते आहे त्यांनी त्यातील रक्कम त्वरित काढून घ्यावी असा ‘सल्ला’ही दिला जाऊ लागला. रिझव्‍‌र्ह बँकेने मात्र त्वरित याबाबत खुलासा करत कोणतीही सरकारी बँक बंद करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय अर्थ सचिव राजीव कुमार यांनीही सरकारी बँका बंद होण्याबाबतची केवळ अफवाच असल्याची ट्विपण्णी केली.

सरकारने १० सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलीनीकरण करण्याचे गेल्याच महिन्यात जाहीर केले आहे. बुधवारच्या अफवेच्या प्रसारात या घटनेचा धागा पकडण्यात आला. समाजमाध्यमांमधून फिरणारी बंद होऊ पाहणाऱ्या बँकांची यादी ही प्रामुख्याने रिझव्‍‌र्ह बँकेच्या दोन वर्षांपूर्वीच्या ताळेबंद सुधार कार्यक्रमात समाविष्ट बँकांची असल्याचे स्पष्ट होते.