पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळण्याच्या विविध मतदानोत्तर सर्वेक्षणांनी दिलेल्या कौलाने हुरळून जाऊन गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सला गुरुवारच्या व्यवहारात २१ हजारांच्या पुढे नेऊन ठेवले. दिवसभरात ४५७ अंशांची झेप घेतल्यानंतर मुंबई निर्देशांक दिवसअखेर २४९.१० अंश वाढीसह २०,९५७.८१ या महिन्याच्या उच्चांकावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८०.१५ अंश वधारणेसह ६,२४१.१० पर्यंत गेला.
मोठय़ा प्रमाणात मतदान झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याच्या संभाव्य आकडेवारीने भांडवली बाजारात गुरुवारी एकदम उत्साह आणला. (दिल्ली, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील निकाल रविवारी लागणार आहेत.) गेल्या दोन व्यवहारांत तब्बल २०० अंशांचे नुकसान सोसणारा मुंबई शेअर बाजार व्यवहाराच्या सुरुवातीलाच एकदम ४४० अंशांची वाढ नोंदविता झाला. याच वेळी त्याने २१ हजार हा अनोखा टप्पाही पार केला. आशियाई आणि अन्य विकसित देशांतील भांडवली बाजार नरम असूनही सेन्सेक्स दिवसभरात २१,१६५.६० पर्यंत झेपावला. यानंतर त्यात उतार येऊ लागला. व्यवहाराच्या अखेरच्या टप्प्यात तो २०,९२९ या दिवसाच्या नीचांकावर येऊन ठेपला. त्यामुळे त्याची बंदअखेर कालच्या तुलनेत जवळपास २५० अंशांच्या वाढीची राहिली. यामुळे बाजाराने ७ नोव्हेंबर २०१३ नंतरचा टप्पा गाठला. त्या वेळी सेन्सेक्स २१,१४२.८५ वर होता.
बाजारात गुरुवारी आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, भेल, मारुती सुझुकी या आघाडीच्या समभागांची खरेदी झाली. सेन्सेक्समधील २० समभागांचे मूल्य उंचावले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ९ समभाग वधारलेले राहिले. बँक समभागांची आघाडी राहिली. तर याच क्षेत्रातील निर्देशांकाची आगेकूच राहिली.
३१ पैशांच्या उसळीने रुपया प्रति डॉलर ६२ खाली
सलग दुसऱ्या व्यवहारात पुन्हा ३० पैशांचीच वाढ नोंदविणारे भारतीय चलन गुरुवारी महिन्याच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले. डॉलरच्या तुलनेत रुपया व्यवहाराअखेर ६१.७५ पर्यंत गेले. चलनाने बुधवारीदेखील ३१ पैशांची उसळी घेतली होती. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपा सरकार येण्याचा सर्वेक्षणांचा कौल रुपयासाठी सकारात्मक ठरला. भांडवली बाजारात विदेशी निधीचा ओघ पुन्हा दिसून येत आहे. त्याचबरोबर बँका, निर्यातदारांकडून भांडवली बाजारात मोठय़ा प्रमाणात व्यवहार झाले. पॉवरग्रिडच्या भागविक्रीपोटी २५ ते ३० कोटी डॉलरचा ओघही बाजारात आला. या साऱ्यांच्या परिणामी चलन दिवसभरात ६१.५३ पर्यंत उंचावले. चलनात कालच्या तुलनेत ०.४८ टक्क्यांची भक्कमता आली आणि ६१.७५ हा त्याने ५ नोव्हेंबरनंतरचा वरचा स्तर गाठला.