19 April 2019

News Flash

रुपयाचा पडझड सप्ताह ; डॉलरमागे ७२ ची वेसही ओलांडली!

रुपयाचा अभूतपूर्व सुरू असलेला घसरण-पथ गुरुवारी सलग सातव्या दिवशी सुरू राहिलेला दिसून आला.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मुंबई : अमेरिकी डॉलरमागे तीव्रपणे घसरत असलेल्या रुपयाने गुरुवारच्या व्यवहारात ७२ च्या खालचाही तळ दाखविला. गुरुवारी दुपारी आंतरबँक चलन व्यवहारात रुपयाने अमेरिकी डॉलरमागे ७२.१२ असा नवीन ऐतिहासिक तळ दाखविला. दिवसअखेर तो काहीसा सावरला तरी बुधवारच्या तुलनेत आणखी २४ पैशांच्या घसरणीसह तो ७१.९९ या तरीही नवीन नीचांकी पातळीवर विसावताना दिसून आला.

रुपयाचा अभूतपूर्व सुरू असलेला घसरण-पथ गुरुवारी सलग सातव्या दिवशी सुरू राहिलेला दिसून आला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी सायंकाळी प्रतिक्रियेदाखल वक्तव्य करून ही रुपयाच्या पडझडीने निर्माण केलेली धास्ती कमी करण्याचा प्रयत्न केला. तरी बुधवारच्या प्रति डॉलर ७१.७५ या सार्वकालिक नीचांकी मूल्याला मागे टाकत गुरुवारीही रुपयाची घसरगुंडी सुरूच राहिली. दुपारच्या सत्रात बुधवारच्या सार्वकालिक नीचांकी मूल्यात आणखी ३७ पैशांच्या भर पडून रुपयाच्या मूल्याने ७२.१२ ची अभूतपूर्व पातळी दाखविली.

वस्तुत: गुरुवारचे चलन बाजारातील व्यवहार हे रुपयाच्या १३ पैशांच्या सकारात्मक उसळीने सुरू झाले होते.

खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती प्रति पिंप ८० डॉलरच्या घरात पोहोचल्या असून, आयातदारांकडून डॉलरच्या मागणीतील वाढ आणि भांडवली बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा रुपयाच्या मूल्यावर अतिरिक्त ताण पडत असल्याचे विदेशी चलन विनिमय क्षेत्रातील विक्रेत्यांचे म्हणणे आहे, किंबहुना गुरुवारी ब्रेन्ट क्रूड खनिज तेलाच्या किमतीतील ०.४ टक्के अशा किंचितशा उताराने तेल आयातदारांकडून डॉलरच्या मागणीतील वाढ आणखीच बळावल्याचेही त्यांचे निरीक्षण आहे.

जगातील सर्वाधिक वेगाने विकास पावत असलेल्या अर्थव्यवस्थेने चलनाच्या मूल्यातील घसरणीवर भयभीत होण्याची आवश्यकता नाही, असे खुलासेवजा निवेदन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी केले. रुपयाच्या पडझडीला कारण ठरेल असे देशांतर्गत अर्थव्यवस्थेत प्रतिकूल काहीही घडत नसून, या पडझडीमागील सर्व कारणे ही जागतिक स्वरूपाची आहेत. गेल्या काही महिन्यात अमेरिकी डॉलर हे सर्वच प्रमुख चलनांच्या तुलनेत सशक्त बनत आले आहे, असे ते म्हणाले.

गेल्या चार -पाच वर्षांत बहुतांश आंतरराष्ट्रीय चलनांच्या मूल्यात डॉलरच्या तुलनेत जितका ऱ्हास दिसून आला आहे, त्या तुलनेत रुपयाची सध्याची स्थिती खूपच चांगली आहे, अशी पुस्तीही जेटली यांनी जोडली. रिझव्‍‌र्ह बँकेने रुपयाच्या घसरणीला लक्षात घेऊन केलेली रेपो दरवाढीचेही जेटली यांनी समर्थन केले. रिझव्‍‌र्ह बँक योग्य तेच करीत असल्याचे म्हणत त्यांनी पाठराखण केली.

रिझव्‍‌र्ह बँकेने चलन बाजारात विविध टप्प्यांवर काहीसा हस्तक्षेप केला आहे, परंतु तो प्रभावहीन ठरला आहे. धोरणकर्त्यांकडून आणखी ठोस पावले पडावीत, अशी बाजाराची अपेक्षा आहे. निदान तेल विपणन कंपन्यांसाठी डॉलर खरेदीची स्वतंत्र खिडकी तरी केली जायला हवी.

 सजल गुप्ता, चलन दर विभागप्रमुख  एडेल्वाइस सिक्युरिटीज

वाढीव निर्यात उत्पन्न आणि परराष्ट्र व्यापार तुटीचे स्वयंचलित समायोजन असे रुपयाच्या घसरणीचे दोन फायदे सांगितले जातात. तथापि ते तितकेसे खरे नाही. निर्यातीतील वाढीचे दीर्घकालीन मुदतीत फायदे दिसणे अवघड आहे. बऱ्याच वर्षांपासून भारताच्या निर्यातीचे परंपरागत वस्तू ते तयार उत्पादनांपर्यंत संक्रमण सुरू असून, तेथे किंमत लवचिकतेपेक्षा उत्पन्नातील लवचीकतेला महत्त्व आले आहे, हे लक्षात घ्यावयास हवे.

डॉ. सौम्य कांती घोष, मुख्य अर्थसल्लागार, स्टेट बँक

अर्थव्यवस्थेपुढे  दुहेरी संकट..

* प्रमुख आशियाई चलनांच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वेगाने घसरत असून, वर्षांरंभापासून प्रति डॉलर त्यात १३ टक्क्य़ांचा ऱ्हास झाला आहे.

* जूनच्या प्रारंभापासून तीन महिन्यात रुपयाचे मूल्य तब्बल ७ टक्क्य़ांनी गडगडले आहे.

* विनिमय मूल्यात तीव्र उतार सुरू असताना, १० वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांचा परतावा दर ८.०६ टक्के अशा बहुवार्षिक स्तरावर पोहोचला आहे.

* खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीचा भडका पाहता, प्रति पिंप ८० डॉलर किंमत नजीकच्या दिवसांत गाठली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

* देशाची ८० टक्के इंधन गरज आयातीद्वारे भागविणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी वरील दोन्ही घटक भयंकर परिणाम साधणारे आहेत.

* गेल्या आर्थिक वर्षांपासून चालू खात्यावरील विस्तारलेले तुटीचे ठिगळ आणखीच विस्तारेल अशी भीती व्यक्त होत आहे.

* इंधन महागल्याच्या परिणाम सर्वदूर किंमतवाढीचा ठरेल आणि देशांतर्गत चलनवाढीलाही खतपाणी घातले जाईल.

* संभाव्य चलनवाढीला रोखण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने सलग दोन वेळा व्याजदरात वाढ करून, कर्जे महाग केली आहेत.

* व्याजदर वाढीचा क्रम पुढे सुरू राहिल्यास, अर्थवृद्धीसाठी गुंतवणूकही आटत जाईल.

First Published on September 7, 2018 3:29 am

Web Title: rupee at 72 against us dollar