मुंबई : अर्थव्यवस्थेचे चित्र अधिक चिंताजनक करणाऱ्या ताज्या आकडेवारीने भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक मंगळवारी एकाच व्यवहारात तब्बल दोन टक्क्यांहून अधिक प्रमाणात आपटले. सुमार सकल राष्ट्रीय उत्पादन आणि निर्मिती क्षेत्राची संथ कामगिरी यामुळे आठवडय़ाच्या पहिल्याच व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीने त्यांचे प्रमुख टप्पे सोडले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारअखेर ७६९.८८ अंश घसरणीसह ३६,५६२.९१ वर येऊन थांबला. तर २२५.३५ अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०,७९७.९०पर्यंत स्थिरावला. सप्ताहारंभीच्या मोठय़ा निर्देशांक घसरणीने सेन्सेक्सने ३६,८०० तर निफ्टीने १०,८०० चा स्तरही सोडला.

सेन्सेक्समधील मोठय़ा निर्देशांक पडझडीने गुंतवणूकदारांचे २.५५ लाख कोटी रुपये कमी झाले. सत्रात सेन्सेक्स जवळपास ८७० अंशांपर्यंत घसरला. अमेरिका-चीन व्यापार युद्धाची छायाही बाजारात सप्ताहारंभी कायम राहिली.

गेल्या सप्ताहाखेर जाहीर झालेला गेल्या सहा वर्षांच्या तळात विसावलेला देशाच्या अर्थव्यवस्थेचा पहिल्या तिमाहीचा संथ वेग आणि सप्ताहारंभाला स्पष्ट झालेला ऑगस्टमधील १५ महिन्यांच्या खोलातील निर्मिती क्षेत्राची सुमार कामगिरी यामुळे भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक चांगलेच ढवळून निघाले.

जुलैमधील प्रमुख क्षेत्राची दोन टक्क्यांखालील प्रगतीही बाजारातील मोठय़ा घसरणीला कारणीभूत ठरली. पायाभूत क्षेत्राशी निगडित प्रमुख आठ क्षेत्रांपैकी निम्मे घसरते राहिले. डॉलरच्या तुलनेत रुपयाने मंगळवारीच ७२ खालील प्रवास नोंदविल्याची दखलही गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा जोर लावताना घेतली.

रुपया नऊ महिन्यांच्या गाळात

भांडवली बाजारातील पडझडीबरोबर परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरसमोर रुपया मंगळवारी थेट त्याच्या गेल्या नऊ महिन्यांच्या तळात विसावला. आठवडय़ाच्या पहिल्याच सत्रात स्थानिक चलन एकदम ९७ पैशांनी रोडावत ७२.३९ पर्यंत खाली आले. यापूर्वी रुपयाने १३ नोव्हेंबर २०१८ रोजी सत्रातील सर्वात मोठी घसरण नोंदविली होती.