डॉलरच्या तुलनेत २१ पैसे वाढून ६८.८४ चा स्तर

सलगपणे सुरू असलेल्या घसरणीत भर घालत रुपयाच्या विनिमय मूल्याने शुक्रवारच्या व्यवहारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ६९.१३ अशा विक्रमी नीचांकाची नोंद केली. दिवसअखेर मात्र पडझडीतून ते सावरलेले दिसले आणि डॉलरमागे २१ पैशांच्या वाढीसह ६८.८४ या पातळीवर स्थिरावले. रुपया गुरुवारीही ४३ पैशांच्या आपटीसह ६९.०५ अशा सार्वकालिक नीचांकावर बंद झाला होता.

आधीच खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीची भरारीने बेजार झालेल्या रुपयाच्या विनिमय मूल्यावर भांडवली बाजारात विदेशी वित्त संस्थांकडून सुरू असलेली विक्री, तसेच आयातदारांकडून भीतीपोटी सुरू असलेल्या डॉलर खरेदीचा रुपयावर ताण पडत आहे, त्यातच डॉलर सर्वच जागतिक चलनाच्या तुलनेत मजबूत होत आहे.

तथापि, शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत रुपया सावरताना दिसला आणि त्याचे मूल्य डॉलरमागे ६८.९६ स्तरापर्यंत सावरले. रिझव्‍‌र्ह बँकेने राखीव गंगाजळीतून डॉलरचा बाजारातील ओघ वाढविल्याचा हा परिणाम असू शकेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. वधारलेल्या डॉलरच्या विक्रीचा बँका आणि निर्यातदारांकडून सुरू झालेल्या सपाटय़ाचा हा परिणाम सांगितला जातो.

अमेरिकी मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझव्‍‌र्हकडून डॉलरच्या मजबुतीच्या पाश्र्वभूमीवर व्याजदरात वाढ करण्याच्या भूमिकेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली. असे करणे अन्य अर्थव्यवस्थांच्या तुलनेत अमेरिकेचे आपणहून खच्चीकरण ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. ही बाब डॉलरच्या कमकुवतपणाला कारणीभूत ठरली आणि रुपयाच्या पथ्यावर पडली.

भांडवली बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांची तीव्र स्वरूपातील निर्गुतवणूक, जागतिक स्वरूपातील डॉलरच्या मूल्यात मजबुतीबरोबरच खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील वाढीने रुपयाच्या मूल्यावर मोठा ताण आणला आहे. चालू वर्षांत विदेशी संस्थांनी तब्बल ६० हजार कोटी भारताच्या समभाग आणि रोखे बाजारातून काढून घेतले आहेत.

सावरलेल्या रुपयामुळे ‘सेन्सेक्स’ला बळ

लोकसभेतील अविश्वास ठराव आणि संभाव्य राजकीय अस्थिरतेच्या भीतीला बाजूला सारत गुंतवणूकदारांनी सप्ताहअखेर भांडवली बाजारात डॉलरच्या तुलनेतील रुपयाच्या भक्कमतेवर प्रतिक्रिया देणे अधिक पसंत केले. माहिती तंत्रज्ञान आणि औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या समभाग खरेदीच्या जोरावर सेन्सेक्सला ३६,५०० नजीक तर निफ्टीला ११,००० पुढे जाता आले.

१४५.१४ अंश वाढीसह सेन्सेक्स ३६,४९६.३७ पर्यंत पोहोचला. तर ५३.१० अंश वाढीमुळे निफ्टी ११,०१०.२० वर स्थिरावला. सत्रात सेन्सेक्स व निफ्टीने अनुक्रमे ३६,५६७.३४ व ११,०३०.२५ या वरच्या टप्प्यावर पोहोचले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवरील अविश्वास ठरावावर प्रत्यक्षात शुक्रवारी निर्णय होत असताना भांडवली बाजारात मात्र रुपयाच्या हालचालींवर व्यवहार झाले. प्रमुख निर्देशांक गेल्या काही सत्रांपासून घसरण नोंदवीत होते.

भांडवली बाजाराची सप्ताहअखेरच्या सत्राची सुरुवात तेजीसह झाली. मुंबई निर्देशांक व्यवहारात ३६,५०० पुढे गेला होता. दिवसअखेर त्या पातळीवरून सेन्सेक्स माघारी फिरला असला तरी गुरुवारच्या तुलनेत वाढ सकारात्मक राहिली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला मात्र ११ हजारापुढील स्तर कायम राखण्यात यश आाले.

साप्ताहिक तुलनेत प्रमुख निर्देशांक मात्र घसरले आहेत. आठवडादरम्यान सेन्सेक्स ४५.२६ अंश तर निफ्टी ८.७० अंशांनी खाली आला आहे.

शुक्रवारी सेन्सेक्समध्ये सन फार्मा सर्वाधिक, २.७२ टक्क्यांसह वाढला. तसेच इन्फोसिस, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, टीसीएस, इंडसइंड बँक आदी २.४२ टक्क्यांपर्यंत वाढले. तर बजाज ऑटो, वेदांता, हीरो मोटोकॉर्प, ओएनजीसी, कोटक महिंद्र, येस बँक, विप्रो, एचडीएफसी लिमिटेड, पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स यांना ८.७३ टक्क्यांपर्यंत घसरणीला सामोरे जावे लागले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती निर्देशांक, भांडवली वस्तू, स्थावर मालमत्ता, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, बँक निर्देशांक १.५१ टक्क्यांपर्यंत वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.७३ व ०.४१ टक्क्यांनी वाढले.

डॉलरमागे ६९.१३ विक्रमी नीचांकाने घबराट

प्रमुख जागतिक चलनाच्या तुलनेत डॉलरच्या मजबुतीचा प्रचंड ताण रुपयाच्या मूल्यावर पडत आहे. शुक्रवारचे प्रारंभिक व्यवहारही त्याचा प्रत्यय देणारे ठरले. रुपयाने डॉलरमागे ६९.१३ असा अभूतपूर्व नीचांक सकाळच्या सत्रात गाठला. घसरणीची तीव्रता पाहता, रुपया प्रति डॉलर ७० ची वेसही ओलांडेल, अशी बाजारात घबराट पसरली. चालू वर्षांत रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत जवळपास १० टक्क्यांनी गडगडले आहे. अलीकडेच २८ जून रोजी रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ६९.१० या ऐतिहासिक नीचांकापर्यंत रोडावलेले दिसले. २८ ऑगस्ट २०१३ रोजी रुपया-डॉलर विनिमयाचा ६८.८० हा नीचांक हा स्तर होता.