अमेरिकन डॉलरपुढील भारतीय चलनाची नांगी सलग दुसऱ्या दिवशी कायम राहिली. डॉलरच्या तुलनेत व्यवहारात ५९ च्या तळात गेलेल्या रुपयाने नवे ऐतिहासिक अवमूल्यन नोंदविले. मध्यवर्ती बँकेचा कथित हस्तक्षेप रुपयाला सावरण्यास कामी पडला असला तरी नव्या नीचांकापासून रोखण्यास हा प्रयत्न अयशस्वी ठरला. याचा विपरित धसका भांडवली बाजारावरही उमटला. एकाच सत्रात त्रिशतकी आपटी घेत सेन्सेक्स मंगळवारी दोन महिन्यांपूर्वीच्या १९ हजारावर येऊन ठेपला आहे.
कालच्या एकाच सत्रात जवळपास सव्वा रुपयाची घसरण नोंदवत ५८ च्या खाली गेलेला रुपया मंगळवारी व्यवहारात ५९ चा तळ गाठता झाला. चलनातील घसरण रोखण्यास अपेक्षित रिझव्‍‌र्ह बँकेचा पायबंद काहीसा कामी ठरला असला तरी त्याला ५८.३९ हा नवा नीचांक नोंदविण्यापासून परावृत्त करू शकला नाही.
सोमवारी १०९ पैशांची घसरण नोंदवित रुपयाला डॉलरच्या तुलनेत ५८.१६ च्या ऐतिहासिक नीचांकाला आणून ठेवणारा रुपया आज दुसऱ्या सत्रात व्यवहारात ५८.९८ पर्यंत घरंगळला होता. याचवेळी रिझव्‍‌र्ह बँकेने हस्तक्षेप केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यातील मोठी घसरण काहीशी थोपविली गेली. मात्र चलनाला त्याचा नवा नीचांक नोंदविण्यास रोखू शकली नाही. रुपयाने डॉलरच्या तुलनेत कालच्या बंदच्या तुलनेत व्यवहाराखेर २४ पैशांची आपटी खात चलनाला ५८.३९ या नव्या नीचांकाला आणून ठेवले. स्थानिक चलनाने सलग दुसऱ्या सत्रातील मोठी घसरण नोंदविली आहे. या दोन दिवसात रुपया २.५ टक्क्यांनी कमकुवत झाला. २०१३ पासून आतापर्यंत रुपया ५.५ टक्क्यांनी खालावला आहे. तर डेट पर्यायातील निधीचे रोडावणे मेपासून ४८.६ कोटी डॉलरचे झाले आहे. तर याच कालावधीत इक्विटीमधील परकी निधीचे आटणे हे ४.१६ अब्ज डॉलरचे आहे.

डॉलरच्या तुलनेत दुसऱ्यांदा ऐतिहासिक नीचांक नोंदविणाऱ्या रुपयातील घसरणीला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकार, रिझव्‍‌र्ह बँक तसेच सेबीमार्फत योग्य वेळी पावले उचलली जातील. भारतीय चलनामध्ये अधिक भक्कमता येण्यासाठी देशात विदेशी गुंतवणुकीचा ओघ वधारता रहावा यासाठीच्या उपाययोजना कायम राबविल्या जातील. यासाठी काही क्षेत्रांमध्ये थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा विस्तारण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल.
रघुरामन राजन, मुख्य आर्थिक सल्लागार.

रुपयाचा विनिमय दर हा आर्थिक घटकांबरोबरच मानसिकतेचाही एक भाग असतो. सध्या भारताबाबतचा दृष्टिकोन बाहेर फारसा उत्साहवर्धक नाही. त्यातच रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांनी रुपयातील अवमूल्यनातील हस्तक्षेपास एका अर्थाने असमर्थताच दर्शविली आहे. याची प्रतिक्रिया म्हणून विनिमय दराने ५८ ची पातळी सोडली आहे. उर्वरित वर्षभरासाठी रुपयाचा विनिमय दर ५४-५६ दरम्यान राहिल, अशी अपेक्षा आहे.
अनुजा जरिपटके-शहा,     सह अर्थतज्ज्ञ, केअर रेटिंग.

डॉलर-युरोचा विनिमय दर १.३० राहिला आणि या आठवडय़ात जाहिर होणारे एप्रिलमधील औद्योगिक उत्पादनात १.५% वाढ नोंदली गेली तर मे महिन्यातील वाढ ही ५% असेल. येत्या सोमवारी जाहिर होणाऱ्या मध्य तिमाही पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँक रेपो दर ०.२५% कमी करेल, अशी आशा आहे. असे प्रत्यक्षात घडले तर डॉलरशी रुपयाचा विनिमय दर नजीकच्या कालावधीत ५६ च्या आसपास असेल.
इंद्रनील सेनगुप्ता, वरिष्ठ अर्थतज्ज्ञ,   बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच.

रुपयाच्या घसरणीबाबत..
डॉलरच्या तुलनेत रुपयातील विक्रमी घसरणीने गुंतवणूकदारांनी विचलित होण्याचे कारण नाही. या घडामोडींमुळे आम्हाला आनंद मुळीच होत नाही; परंतू त्याबाबत चिंता करण्याचेही कारण नाही. रुपयातील सध्याची कमालीची अस्थिरता ही तात्पुरत्या कालावधीसाठी आहे. येत्या तीन ते चार दिवसात रुपयातील घट संपुष्टात येताना दिसून येईल. या कालावधीत मोठय़ा प्रमाणात विदेशी गुंतवणुकीचा ओघ येईल. तसे दिशादर्शन सरकारला मिळत आहे. आम्ही याबाबत सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आहोत. विदेशी गुंतवणूकदार डेटसारख्या पर्यायामध्ये निधी ओततील. यामुळे भारतीय चलन सध्याच्या पातळीपासून वधारते असेल.
वाढत्या सोने वापराबद्दल..
सोने धातूची वाढती मागणी रोखण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही कालावधीत उचललेल्या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. मौल्यवान धातू खरेदीसाठी आवश्यक असलेल्या विदेशी चलनाची मागणी कमी होताना दिसत आहे. गेल्या ५ ते ७ दिवसात तर सोने खरेदीसाठीची विदशी चलनाची मागणी कमालीने रोडावली आहे. एरवी सर्वाधिक म्हणून २.२७ कोटी डॉलरची मागणी असताना या कालावधीत नेमक्या दिवशी अवघ्या ७० लाख डॉलरच्या परकी चलनाची मागणी नोंदविली गेली आहे. सोने मागणीतील ही लक्षणीय घट मानली जाते. यामुळे चालू खात्यातील तुटीवरही नियंत्रण मिळेल.