सलग चार व्यवहारांतील घसरणीमुळे महिन्याच्या तळाला आलेला रुपया बुधवारी पाचव्या सत्रातही नरमल्याने आठ महिन्यांहून अधिक कालावधीतील नीचांकाला येऊन ठेपला. डॉलरच्या तुलनेत रुपया आता ६२ नजीक पोहोचला आहे. बुधवारी २२ पैशांनी घसरत भारतीय चलन ६१.९६ पर्यंत खाली आले. गेल्या पाच व्यवहारांतील रुपयातील घसरण आता ४५ पैशांची झाली आहे. यामुळे रुपया थेट ६२ नजीक जाऊन पोहोचला आहे. मंगळवारी ६१.७४ या तळात विसावलेल्या रुपयाने बुधवारचा प्रवासही ६१.८० या नरमाईने सुरू केला. व्यवहारात चलन ६१.९९ पर्यंत घसरले. बंद होताना रुपया काहीसा सावरला असला तरी ६२ नजीकचा त्याचा प्रवास कायम आहे. रुपया यापूर्वी ६२ नजीक मार्च २०१४ मध्ये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये कमालीची घसरण येत असताना भारतीय चलनातील कमकुवततेने येथील अर्थव्यवस्थेवरील चिंतेत भर घातली आहे.

बाजारक्रम सुरूच..
व्यवहारात सलग चौथ्या दिवशी नव्या उच्चांकाला पोहोचलेल्या भांडवली बाजारातील नफा पदरात पाडून घेण्याचा क्रम गुंतवणूकदारांनी बुधवारीही कायम ठेवला. २८,२९४.०१ पर्यंत गेलेला सेन्सेक्स पाहून नफेखोरांनी दिवसअखेर मुंबई निर्देशांकाला १३०.४४ अंश घसरण नोंदविण्यास भाग पाडत २८ हजारांवरून २८,०३२.८५ पर्यंत आणून ठेवले. तर सत्रात ८,४५५.६५ची झेप घेणारा निफ्टीदेखील बंद होताना मंगळवारच्या तुलनेत ४३.६० अंश घसरणीसह ८,३८२.३० पर्यंत येऊन ठेपला. रुपया ६२ पर्यंत जाण्याची धास्तीदेखील बाजारात दिसली.