X

घसरत्या रुपयाचा ७२-७३ चा तळ लवकरच – तज्ज्ञांचा कयास

रुपयाने प्रति डॉलर ७१.३७ म्हणजे सोमवारच्या तुलनेत १६ पैशांच्या घसरणीनेच केली

आणखी ३७ पैशांच्या घसरगुंडीसह डॉलरमागे ७१.५८चा विक्रमी नीचांक

मुंबई : अमेरिकी डॉलरपुढे रुपयाचे विनिमय मूल्य निरंतर नवीन नीचांक गाठताना दिसत असून, नजीकच्या काळात त्यापासून उसंत मिळण्याची शक्यता नसल्याचा तज्ज्ञांचा कयास आहे. मंगळवारच्या व्यवहारात आणखी ३७ पैशांच्या घसरणीने प्रति डॉलर  ७१.५८ असा विक्रमी तळ रुपयाने दाखविला. बहुतांश तज्ज्ञ रुपयाकडून ७२-७३चा तळही लवकरच दिसेल अशी शक्यता वर्तवित आहेत.

खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत निरंतर सुरू असलेली वाढ तसेच चीन-अमेरिका या महासत्तांमध्ये रंगलेले व्यापार युद्ध याचे चलन बाजारात विपरीत पडसाद उमटत आहेत. याचा रुपयाच्या मूल्यावर स्पष्टपणे ताण पडलेला दिसून येतो. इंधन आयात खर्चात मोठय़ा वाढीने देशाच्या चालू खात्यावरील तूट वाढून अर्थव्यवस्थेला याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील, या चिंतेने रुपयाच्या मूल्यातील अस्थिरतेला खतपाणी घातले आहे.

या स्थितीत रुपयाने डॉलरमागे ७१ पल्याडची पातळी गाठणे फारसे आश्चर्यकारक नाही. या मागची कारणे वाढती तूट, पर्यायाने अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, तेल भडका, विदेशी गुंतवणूकदारांचे पलायन वगैरेबद्दल गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहेच, त्याचेच प्रत्ययी परिणाम रुपयाच्या घसरत्या मूल्यात दिसून येत आहेत, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसच आनंद जेम्स यांनी स्पष्ट केले.

चलन बाजारात मंगळवारच्या व्यवहाराची सुरुवात रुपयाने प्रति डॉलर ७१.३७ म्हणजे सोमवारच्या तुलनेत १६ पैशांच्या घसरणीनेच केली. आयातदारांकडून डॉलरची सशक्त मागणी आणि भांडवली बाजारातून विक्रीपायी विदेशी गुंतवणुकीचे निर्गमन असा दुहेरी फटका रुपयाला बसताना दिसली. परिणामी दिवसअखेर घसरण विस्तारत जाऊन ३७ पैशांवर पोहोचली आणि डॉलरमागे ७१.५८ हा सार्वकालिक नीचांक रुपयाने दाखविला.

रुपयाची पडझड सुरू असताना, रिझव्‍‌र्ह बँकेने निरपेक्षवृत्ती ठेवून कोणताही हस्तक्षेप न करण्याचे धोरण असल्याने रुपयाच्या घसरगुंडीला बांध घालणे आणखी अवघड बनले असल्याचे मत, स्टेट बँकेच्या संशोधन अहवालाने व्यक्त केले आहे. ही पडझड रोखण्यासाठी व्याजदरात वाढीचे कठोर पतधोरण रिझव्‍‌र्ह बँकेने स्वीकारणे अपरिहार्य असून, त्याचप्रमाणे ‘स्थायी ठेव सुविधा (एसडीएफ)’ या कल्पनेला स्वीकृती देऊन त्याची ताबडतोबीने अंमलबजावणी करावी, असा स्टेट बँकेने या टिपणाद्वारे उपाय सुचविला आहे.