डॉलरच्या तुलनेत ६४ पर्यंत घसरणाऱ्या रुपयाने २० महिन्यांपूर्वीचा तळ गुरुवारी पुन्हा दाखविला. विनिमय व्यवहारात १० पैशांनी घसरल्यानंतर रुपया गुरुवारअखेर प्रति डॉलर ६४ वर स्थिरावला.
बुधवारी रुपया ६४ च्या काठावर, ६३.९० वर विसावला होता. रुपयाने गुरुवारच्या सत्राची सुरुवातच ६४च्या खालच्या प्रवासाने केली. चलन सकाळच्या व्यवहारात ६४.१० पर्यंत घसरले. यानंतरही ही घसरण वाढतच गेली. दिवसभरात ६३.९८ पर्यंतच रुपया उंचावू शकला.–
शेअर घसरण कायम
मुंबई : सलग दोन दिवस मोठी आपटी नोंदविणाऱ्या भांडवली बाजारात गुरुवारी पुन्हा घसरण झाली तरी ती तुलनेत किरकोळ होती. सेन्सेक्स २३.७८ अंश घसरणीसह २६,८१३.४२ वर बंद झाला, तर ४.४५ अंश घसरणीसह निफ्टी ८,१३०.६५ वर स्थिरावला. तीन व्यवहारात मिळून सेन्सेक्सचे नुकसान १,०३५.५७ अंशांचे राहिले आहे. सेन्सेक्स व्यवहारात २६,९४८.८४ पर्यंतच पोहोचू शकला, तर निफ्टीचा सत्रातील किमान स्तर ८,१०० च्या खाली ८,०५६.७५ नोंदला गेला.