डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली घसरण सलग पाचव्या दिवशीही कायम राहिली असून, गुरुवारी रुपया आणखी २७ पैशांनी घसरला. यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया गेल्या नऊ महिन्यातील नीचांकी पातळीवर जाऊन पोहोचला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारी ६८.८३ वर जाऊन पोहोचला होता.

महिनाअखेरमुळे निर्यातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्यामुळे रुपयाच्या दरात घसरण सुरू असल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांनी म्हटले आहे. देशातील भांडवली बाजारातील चढ-उताराचा परिणामही रुपयाच्या घसरणीवर होत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. बुधवारी झालेल्या व्यवहारामध्ये रुपयाची डॉलरच्या तुलनेत ३१ पैशांनी घसरण झाली होती आणि तो प्रति डॉलर ६८.५६ वर जाऊन पोहोचला होता. गुरुवारी सकाळी व्यवहार सुरू झाल्यावर त्यामध्ये आणखी घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये २७ पैशांनी घसरून ६८.८३ वर जाऊन पोहोचला.

नोव्हेंबरच्या सुरुवातीला अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय संपादन केल्यापासून डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण सुरूच आहे. या कालावधीमध्ये रुपया तब्बल २.९२ टक्क्यांनी घसरला आहे.