२०१८ ची सुरुवात भांडवली बाजाराने घसरणीने केली असली तरी परकी चलन विनिमय मंचावर रुपयाने सोमवारी दमदार कामगिरी बजाविली.

डॉलरच्या तुलनेत रुपया सप्ताहारंभी एकाच व्यवहारात १९ पैशांची उसळी नोंदविणारा ठरला. स्थानिक चलनाचा हा गेल्या पाच महिन्यांचा सर्वोत्तम टप्पा राहिला.

सोमवारअखेर रुपया ६४.६८ वर स्थिरावला. यापूर्वीच्या त्याचा सर्वोत्तम स्तर ८ ऑगस्ट रोजी, ६३.६३ असा होता. गेल्या तीन व्यवहारात रुपया ४७ पैशांनी भक्कम बनला आहे.

सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे देशात भांडवली ओघ पुन्हा येण्याच्या आशेने परकी चलन विनिमय मंचावर वर्षांरंभीच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. २०१७ मध्ये रुपया डॉलरसमोर ६ टक्क्य़ांनी भक्कम झाला आहे. मात्र जागतिक बाजारात खनिज तेल दराच्या उसळीने चिंता निर्माण झाली आहे. परिणामी प्रमुख भांडवली बाजाराच्या निर्देशांकांनी नव्या वर्षांची सुरुवात घसरणचिंतेने केली.

दरम्यान, मुंबईच्या सराफा बाजारा मौल्यवान धातूंच्या दरात पुन्हा एकदा तेजी नोंदली गेली. सोमवारी सोन्याचा तोळ्याचा भाव १३५ रुपयांनी वाढून २९,३७५ रुपयांवर गेला. तर चांदी २९५  रुपयांनी वाढत ३८,७२० रुपयांवर स्थिरावली.