डॉलरसमोर सलग दुसऱ्या व्यवहारात घसरण नोंदविताना रुपया गुरुवारी ६७ नजीक पोहोचला. बुधवारच्या तुलनेत त्यातील ११ पैशांच्या घसरणीमुळे स्थानिक चलन ६६.९३ या गेल्या तीन आठवडय़ांच्या तळात पोहोचले. भांडवली बाजारात पडझड नोंदविणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांना भासणाऱ्या अतिरिक्त अमेरिकी चलनामुळे हे घडले. परकी चलन विनिमय मंचावर रुपयाचा डॉलरच्या समोरील प्रवास गुरुवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात ६६.८५ या किमान स्तरावरच सुरू झाला. व्यवहारात त्यातील घसरण ६६.९७ पर्यंत विस्तारली. तर दिवसअखेर तो बुधवार बंदअखेरच्या व्यवहारासमोर ०.१६ टक्क्यांनी रोडावला. स्थानिक चलनाची गेल्या सलग दोन व्यवहारांतील घसरण ही एकूण ३३ पैशांची राहिली आहे.