सक्रिय हस्तक्षेपाची अर्थतज्ज्ञांकडून मागणी; ‘संघा’कडूनही टीका 

मुंबई : प्रति पिंप ८५ डॉलरनजीक किमतीचा स्तर गाठणाऱ्या खनिज तेलाने स्थानिक चलन- रुपयाला नव्या ऐतिहासिक नीचांकाला लोटले. अमेरिकी डॉलरसमोर रुपया मंगळवारच्या व्यवहारात तब्बल ३३ पैशांनी गडगडत पहिल्यांदाच ७४.३९ स्तरावर रोडावले.

खनिज तेलाच्या किमती गेल्या काही सत्रांपासून सातत्याने वाढत आहेत. इराणवरील नोव्हेंबरपासूनचे अमेरिकेच्या निर्बंध लागू होण्याची मुदत जसजशी नजीक येत आहे, तसतसा चलनावरील दबावही वाढत चालला आहे. भारतीय रुपयाचे मूल्य यापूर्वीच ७४ च्या खाली गेले आहे.

भक्कम डॉलरमुळे भांडवली बाजारातूनही विदेशी गुंतवणूकदारांनी काढता पाय घेण्याचे धोरण कायम आहे. यामुळे प्रमुख निर्देशांकांची गेल्या काही सत्रांपासूनची निर्देशांक आपटी सुरू आहे. येथील परकीय चलन विनिमय मंचावर रुपया मंगळवारी ७४ च्या आणखी खाली गेला.

मंगळवारच्या सुरुवातीच्या सत्रात रुपया काहीसा भक्कम होता. डॉलरसमोर तो १८ पैशांनी भक्कम होता. मात्र सत्रअखेर त्यातील घसरण विस्तारत गेली. सोमवारच्या तुलनेत त्यात ३३ पैशांची घसरणभर पडून रुपया ७४.३९ पर्यंत रोडावला. सोमवारीही रुपया ३० पैशांनी आपटत ७४.०६ या तळाला प्रथमच पोहोचला होता.

रुपयाच्या विनिमय मूल्याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने कोणतीही पातळी निश्चित केलेली नसून, ते बाजारातील नैसर्गिक मागणी-पुरवठा तत्त्वावर ठरविले जायला हवे, असे मत गेल्या आठवडय़ात रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी पतधोरण बैठकीपश्चात पत्रकारांशी बोलताना शुक्रवारी व्यक्त केले. रिझव्‍‌र्ह बँकेची प्राथमिकता ही मुख्यत: महागाई दराच्या नियंत्रणाला असल्याचे नमूद करून, रुपयाच्या मूल्याबाबत काळजी करण्यासारखे काही नसल्याचे गव्हर्नरांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले.

शुक्रवारी केल्या गेलेल्या वक्तव्यापश्चात रुपयाच्या मूल्यात तीव्र गतीने घसरणीचे पडसाद उमटल्याचेही दिसून आले. मंगळवार अखेर ते ७४.३९ अशा ऐतिहासिक नीचांकावर रोडावले. शुक्रवारपासून रुपयाचे मूल्य तब्बल ८६ पैसे गडगडले आहे.

‘रिझव्‍‌र्ह बँकेला हस्तक्षेप करावाच लागेल’

मुंबई : रुपयाच्या मूल्यासंदर्भात रिझव्‍‌र्ह बँकेच्या निरपेक्ष भूमिकेचा अनेक अर्थतज्ज्ञांनी टीकात्मक समाचार घेतला असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न स्वदेशी जागरण मंचानेही मध्यवर्ती बँकेकडे सक्रिय हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

इंडोनेशिया आणि फिलिपाइन्ससारख्या आशियाई देशांनी त्यांच्या चलनातील घसरणीला थोपविण्यासाठी व्याजदरात वाढीसारख्या आयुधांचा वापर सढळपणे, रिझव्‍‌र्ह बँक मात्र अप्रत्यक्षपणे बेफिकिरी दर्शविणे हे अनुचित असल्याचे एडेल्वाइज सिक्युरिटीजच्या अर्थतज्ज्ञ माधवी अरोरा यांनी मत व्यक्त केले. वस्तुत: घसरलेल्या रुपयामुळे आयात महाग होते आणि आयातीत वस्तूंमुळे महागाई दरातील वाढीतून रिझव्‍‌र्ह बँकेच्या त्या संबंधीचे लक्ष्यच धोक्यात येते, याकडे अरोरा यांनी लक्ष वेधले.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढण्यासह अमेरिकेच्या सरकारी रोख्यांवरील व्याज ३.२६ टक्क्यांवर पोहोचले आहे. वाढत्या खनिज तेलाच्या किमती आणि अमेरिकी रोख्यांवरील अधिकचे व्याज यामुळे येथील रुपयावरही दबाव निर्माण झाला आहे. तर भारतातही १० वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांवरील परतावा ८ टक्क्यांपुढे गेला आहे, याकडे  एचडीएफसी सिक्युरिटीजचे भांडवली बाजार धोरणप्रमुख  व्ही. के. शर्मा यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, स्वदेशी जागरण मंचानेही रुपयाच्या मूल्यऱ्हासावर गंभीरपणे चिंता व्यक्त करताना, रिझव्‍‌र्ह बँकेला समर्पक पावले टाकण्याचे आवाहन केले आहे. मंचाने १३ ऑक्टोबरला या विषयावर अर्थतज्ज्ञांची गोलमेज परिषद आयोजित केली आहे. मंचाचे सह-निमंत्रक अश्वनी महाजन यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत, रुपयाच्या मूल्यात घसरणीने सर्वसामान्यांना महागाईच्या झळा बसणार असल्याने सरकारनेही या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्या वक्तव्याकडे निर्देश करीत, सरकारशी संलग्न असलेल्या अर्थतज्ज्ञांनी रुपयाच्या घसरणीबाबत भाष्य करताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.