एप्रिल महिन्यात भारतीय चलनाचे अर्थात रुपयाचे विनिमय मूल्य १.५ टक्क््यांहून जास्त घसरले. या महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीदेखील अनुक्रमे ४.५ ते ३.३ टक्क््यांनी घसरले आहेत. भारतीय चलनातील हा कमकुवतपणा आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता असून लवकरच रुपया ७६ ची पातळी खाली जाईल, असे मत एंजल ब्रोकिंगच्या चलनविषयक संशोधक, हीना नाईक यांनी व्यक्त केले.

भारतीय भांडवली बाजार आणि चलनातील घसरणीची मुख्य कारणे देशांतर्गतच असल्याचे त्या म्हणाल्या. गुरुवारच्या व्यवहारातही रुपया डॉलरच्या तुलनेत सहा पैशांनी कमजोर होऊन, प्रति डॉलर ७४.९४ रुपयांच्या पातळीवर कलंडला. दिवसाच्या व्यवहारात त्याने ७५ च्या पुढेही घसरण दाखविली होती.

दुसऱ्या लाटेसह थैमान घालत असलेला करोना विषाणूचा नवा प्रकार आहे. दुहेरी म्युटेशन म्हटले जात असलेल्या या विषाणूमुळे भारतात त्सुनामीच्या वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे अनेक राज्यांत कडक निर्बंध आणि टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी, अर्थव्यवस्थेवर संभवणारे दुष्परिणाम पाहता, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी एप्रिल महिन्यात आतापर्यंत भारतीय बाजारातून ४,६१५ कोटी रुपये काढून घेतले आहेत. विदेशी गुंतवणुकीच्या या निर्गमनामुळे डॉलरची मागणी वाढत आहे आणि या घटकाचा रुपयाच्या मूल्यावर ताण येत आहे, असे त्यांनी सांगितले.