भारतीय चलन रुपयाने चालू वर्षांतील दुसरी मोठी ४५ पैशाची झेप डॉलरमागे ६०.८९ या पातळीवर शुक्रवारी विश्राम घेतला. सरकारने खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेतील ९ टक्के हिस्सा भांडवली बाजारात विक्रीला काढल्याने त्याच्या खरेदीसाठी विदेशी वित्तसंस्थांकडून आलेल्या डॉलरमुळे रुपयाने ही बळकटी कमावली. तथापि देशातील निवडणूक-पूर्व सकारात्मक भावनांनी चलन बाजारालाही वेढले असून, रुपयाची डॉलरमागे ५९ची पातळी नजीकच्या काळात दृष्टिपथात असल्याचे कयास बांधले जात आहेत.
काल (गुरुवारी) रुपयाने २०१४ सालातील सर्वात मोठी ३९ पैशांची घसरण दाखवून प्रति डॉलर ६१.२० पातळीवर प्रयाण केले होते. तथापि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमुख सहा जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलरच्या कमजोरी पाहता आज देशात निर्यातदारांनी केलेली डॉलरची विक्री ही रुपयाच्या पथ्यावर पडली. तथापि सकाळच्या सत्रात रुपयाने ६१.३४ अशा नीचांकापर्यंत घसरण दाखविली होती. परंतु नंतर विदेशी वित्तसंस्थांकडून शेअर बाजारातील खरेदीसाठी झालेल्या डॉलरच्या विनिमयाने रुपयाला लक्षणीय आधार दिला.
या अगोदर ६ मार्च २०१४ रोजी रुपयाने ६४ पैशांची विक्रमी उसळी घेतली आहे. रुपयाच्या शुक्रवारच्या सत्रातील उसळीमुळे एकूण आठवडय़ात त्याने डॉलरच्या तुलनेत ३० पैशांची मजबुती मिळविली आहे. शुक्रवारच्या दिवसात उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, विदेशी वित्तसंस्थांनी भांडवली बाजारात ४,२०० कोटी रुपयांची खरेदी केली.
चलन बाजारात शेअर बाजारातील उत्साहाचेच प्रतिबिंब उमटताना दिसत असून, त्या ठिकाणी विदेशातून भांडवलाचा ओघ जितका वाढेल तितकी रुपयाला बळकटी मिळत राहील, असे बँक ऑफ अमेरिकाचे व्यवस्थापकीय संचालक जयेश मेहता यांनी सांगितले. रुपयाची ही बळकटी त्याला नजीकच्या काळात डॉलरमागे ५९च्या पातळीवरही नेऊन बसेल, असा मेहता यांचा कयास आहे आणि हे निवडणुकांपूर्वीच शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.