जगभरातील भांडवली बाजार सप्ताहअखेर तेजीवर पोहोचले असताना आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दरही गेल्या एक तपाच्या तळातून बाहेर आले. तर भारतात परकी चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक भक्कम झाला.

लंडनच्या बाजारात खनिज तेलाचे दर शुक्रवारी प्रति पिंप १.२१ टक्क्यांनी वाढून ३४.१६ पर्यंत वाढले, तर अमेरिकेच्या बाजारातील तेल दरातही जवळपास याच प्रमाणात वाढ होऊन ते ३४ डॉलरच्या आसपास स्थिरावले. गेल्या काही सत्रांत पिंपामागे ३४ डॉलरखाली जात खनिज तेल दराने २००४ नजीकचा तळ अनुभवला होता.

गेल्या सलग काही व्यवहारांपासून घसरत असलेला रुपया शुक्रवारी ३० पैशांनी भक्कम होत ६६.६३ वर पोहोचत तीन सप्ताहांच्या नीचांकातून वर स्थिरावला. सुरुवातीपासूनच तेजीसह सुरू असलेला स्थानिक चलनाचा प्रवास सत्रात ६६.५९ पर्यंत झेपावला.