महागाईवाढीवर नियंत्रण, रोजगार निर्मितीसाठी उपाययोजना या सर्वसामान्यांच्या मागण्यांसह सर्वाना निवृत्तीवेतन, किमान मासिक वेतन १० हजार रुपये, कंत्राटी कामगारांनाही नियमित कामगारांप्रमाणे वेतन आदी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी देशभरातील ग्रामीण बँकांमधील कर्मचारी फेब्रुवारीत दोन दिवसांच्या संपावर जात आहेत. कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी, संघटित-असंघटित कामगारांसाठी सामायिक सामाजिक सुरक्षितता, राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा निधीचे निर्माण, नियमित कामे बाहेरिल स्त्रोताऐवजी अंतर्गत रचनेतून करणे आदी मागण्याही संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. ‘अखिल भारतीय क्षेत्रीय ग्रामीण बँक कर्मचारी संघटने’च्या (एआयआरआरबीईए) नेतृत्वाखाली २० व २१ फेब्रुवारी रोजी संप करण्यात येणार आहे. संघटनेची कोलकत्ता येथे सोमवारी झालेल्या याबाबतच्या बैठकीत या बँकांच्या १७,००० शाखांमधील कर्मचारी, अधिकारी संपात सहभागी होतील, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस दिलीपकुमार मुखर्जी यांनी दिली.