22 February 2020

News Flash

स्थिर दृष्टिकोनासह ‘बीबीबी-’ पतमानांकन कायम

‘एस अँड पी’ला अर्थ-उभारीचा विश्वास

| February 14, 2020 02:20 am

‘एस अँड पी’ला अर्थ-उभारीचा विश्वास

नवी दिल्ली : जागतिक पतमानांकन संस्था ‘एस अँड पी’ने भारताचे सार्वभौम पतमानांकन हे स्थिर दृष्टिकोनासह ‘बीबीबी – (उणे)’ या पातळीवर कायम ठेवले असून, देशाचा आर्थिक विकास दर पुन्हा उभारी घेईल, असा विश्वासही गुरुवारी व्यक्त केला. भारतातील सध्याची आर्थिक मंदावलेपण हे व्यापारचक्राचा परिणाम असून, कोणताही संरचनात्मक दोष त्यामागे नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

एस अँड पीचे हे पतमानांकन भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातील सरासरीपेक्षा जास्त वाढ, सुकर बाह्य़ परिस्थिती आणि विकासशील पतविषयक स्थितीला प्रतिबिंबित करणारे आहे. भारताच्या सशक्त लोकशाही संस्थात्मक रचना ही धोरणात्मक स्थिरतेला चालना देते, अशी पुस्तीही तिने जोडली आहे.

नजीकच्या काळात आर्थिक विकासदरात सुधारणेचे संकेत देताना, एस अँड पीने २०२०-२१ मध्ये ६ टक्के, त्यानंतरच्या वर्षांत ७ टक्के, तर त्यापुढे ७.४ टक्के विकासदराचे कयास व्यक्त केले आहेत. ‘‘वास्तविक उत्पादन दर मंदावल्याच्या अलीकडची स्थिती असतानाही, समान उत्पन्न गटातील स्पर्धक अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी तुलनेने सरस राहण्याची आशा आहे,’ असे तिचे निरीक्षण आहे. अर्थव्यवस्थेस उपकारक पतविषयक धोरण, वित्तीय वाटचाल आणि व्यापारचक्रातील सुधारणेचे पाठबळ मिळून आर्थिक उभारी दृष्टिपथात असून, २०२० ते २०२४ या आर्थिक वर्षांदरम्यान अर्थवृद्धीदर ७.१ टक्क्य़ांचा राहील, असा विश्वास या जागतिक संस्थेने व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी संघटनेने भारताचा अर्थवृद्धीदर विद्यमान २०१९-२० आर्थिक वर्षांत ५ टक्क्य़ांवर मंदावण्याचे यापूर्वीच भाकीत केले आहे. तर आगामी आर्थिक वर्षांत तो ६ टक्क्य़ांपर्यंत वाढण्याचे कयास व्यक्त केले गेले आहेत.

सरलेल्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकासदर ४.५ टक्के असा सहा वर्षांचा नीचांक गाठणारा राहिला आहे. सलग पाचव्या तिमाहीत विकासदर हा आधीच्या वर्षांतील त्याच तिमाहीत घसरत आला आहे.

First Published on February 14, 2020 2:20 am

Web Title: s and b retained india s sovereign ratings at bbb zws 70
Next Stories
1 मालमत्तेत एसबीआय म्युच्युअल फंड अव्वलस्थानी
2 वर्षांरंभीच महागाईचा सहा वर्षांचा उच्चांक
3 सहाराच्या स्थावर मालमत्ता व्यवसायात विदेशी गुंतवणूकदारांना स्वारस्य