मात्र अर्थवृद्धीत घसरणीचा ‘एस अँड पी’चा अंदाज

भारताचे सार्वभौम पतमानांकन दोन वर्षांच्या कालावधीसाठी सध्या आहे त्याच स्तरावर कायम राहिल, अशी ग्वाही जागतिक पतमानांकन संस्था ‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज’ने शुक्रवारी दिली. अर्थात पतमानांकन आणखी घसरणीची शक्यता नाही, हा यातून संकेत दिला गेला आहे. किंबहुना देशाच्या अर्थव्यवस्थेकडून आगामी दोन वर्षांत तुलनेने चांगला वेग पकडला जाईल अशी  शक्यता दिसत असून, त्यातून पतमानांकन वाढीची पृष्ठभूमी तयार केली जाईल, असे या पतमानांकन संस्थेचे आश्वाासक प्रतिपादन आहे.

वर्षारंभी वर्तविलेल्या अनुमानात, भारतीय अर्थव्यवस्था २०२१-२२ या आर्थिक वर्षात ११ टक्क्यांची दमदार वाढ नोंदवेल असे भाकीत एस अँड पीने केले होते. जर करोनाच्या दुसऱ्या लाटेने मे महिन्यात शिखर गाठून उतार दर्शविला तर सकल राष्ट्रीय उत्पादन वाढ ९.८ टक्क्यांपर्यंत खाली येईल. मात्र सध्याची साथीच्या थैमानाची गंभीर परिस्थितीत जूनअखेरपर्यंत कायम राहून, रुग्णसंख्येत वाढीचा दर असाच कायम राहिल्यास, अर्थवृद्धीचा दर ८.२ टक्केच राहू शकेल, असा तिचा कयास आहे.

एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जचे संचालक अँड्य्रू वूड यांनी शुक्रवारी करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भारतावरील परिणाम या विषयावर वेबसंवादी कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले की, ‘सरकारच्या वित्तीय स्थितीवर या भयानक लाटेतून कोणताही मोठा परिणाम साधला जाण्याची शक्यता दिसून येत नाही.’ सध्याची परिस्थिती हाताळताना सरकारला थोडा अधिकचा खर्च करावा लागेल आणि त्या तुलनेत सरकारकडे येणारा महसूल काहीसा घटलेला दिसून येईल. तथापि उसनवारीच्या माध्यमातून वित्तीय संतुलन राखले जाईल, असे त्यांनी सांगितले.

भारताचे सध्याचे सार्वभौम पतमानांकन हे ‘बीबीबी उणे (मायनस)’ असे आहे. पुढील दोन वर्षे तरी त्यात कोणताही बदल संभवण्याची अपेक्षा करता येत नाही, असे वूड म्हणाले. तथापि कोविड-१९ च्या अधिक तीव्र स्वरूपाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मुकाबला करताना त्याच्या काही झळा अर्थव्यवस्थेला बसू शकतील आणि त्याचे प्रतिबिंब सार्वभौम पतमानांकनविषय मापदंडांमध्ये उमटू शकेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

एस अँड पीने गेल्या वर्षी गुंतवणूकदृष्ट्या सर्वात शेवटच्या पायरीवर म्हणजे ‘बीबीबी उणे’ असे भारताचे सार्वभौम पतमानांकन खाली आणले आहे, तर सलग १३ व्या वर्षी देशाच्या अर्थव्यवस्थेविषयक स्थिर दृष्टिकोन कायम ठेवला आहे.

आरोग्यविषयक स्थितीतील सध्याचा बिघाड पाहता वाढीचे पूर्वानुमान खालावत आले आहेत. मात्र चालू आर्थिक वर्षात कोणत्याही परिस्थितीत अर्थव्यवस्थेत सकारात्मक वाढ दिसून येईल, असे वूड यांनी खात्रीपूर्वक सांगितले. तर दोन वर्षांच्या काळात अधिक वेगवान प्रगतीचा प्रत्यय भारताकडून दिसून येईल, असा विश्वाासही त्यांनी व्यक्त केला. २०२१-२२ मध्ये वाईटात वाईट स्थितीत ७.८ टक्के, तर ‘मध्यम’ परिस्थितीत ९.८ टक्के दराने अर्थव्यवस्थेत वाढीचा तिचा कयास आहे.

अर्थव्यवस्थेवर कठोर आघाताची शक्यता अत्यल्प – अर्थ मंत्रालय

नवी दिल्ली : मागील वर्षातील पहिल्या लाटेप्रमाणे यंदा देशभर थैमान सुरू असलेल्या दुसऱ्या करोना लाटेचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर कठोर घाव सोसावे लागणार नाहीत, आश्वासक सूर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या टिपणातून व्यक्त केला.

आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीतील आर्थिक क्रियांवर विपरीत परिणामाच्या शक्यतेची कबुली देताना, अर्थ मंत्रालयाने करोनाच्या दुसऱ्या लाटेचे अर्थव्यवस्थेवरील प्रभाव फार घातक नसतील, असे प्रतिपादन केले आहे. गेल्या वर्षातील पहिल्या लाटेचा अनुभव गाठीशी आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून कोविड-१९ शी सामना करण्यासंदर्भात काही चांगले धडे भारताने मिळविले आहेत, त्यामुळे या दुसऱ्या लाटेच्या धडकांना सहजपणे सोसून अर्थव्यवस्था तग धरून राहील, असा विश्वाास अर्थमंत्रालयाने प्रसृत केलेल्या टिपणाने व्यक्त केला आहे. उलट अर्थव्यवस्थेत अलीकडच्या काही महिन्यांत दिसलेल्या उभारी आणि वेगवान झालेल्या अर्थचक्राचा सरकारकडे गोळा होणाऱ्या महसुलात उत्साहदायी प्रतिबिंब पडत असलेले दिसले आहे. सलग सहा महिने एक लाखांहून अधिक वस्तू व सेवा कराची देशस्तरावर वसुली झाली असून, एप्रिलमध्ये १.४१ लाख कोटी रुपयांचे विक्रमी संकलन साधले गेले आहे. अर्थव्यवस्थेत पुनर्उभारीची प्रक्रिया निरंतर सुरूच असल्याचे हे द्योतक आहे, असे टिपणात नमूद करण्यात आले आहे.