देशातील सर्व बंदरांना जोडणारी मालवहन सेवा देणारी पहिली कंपनी या लौकिकाचा जास्तीत जास्त व्यावसायिक लाभ पंतप्रधान मोदी यांनी संकल्पिलेल्या ‘सागरी माला’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून मिळविण्याचे लक्ष्य मुंबईस्थित श्रेयस शिपिंग अॅण्ड लॉजिस्टिक्स कंपनीने ठेवले आहे.
आजच्या घडीला देशाच्या प्रत्येक बंदरात कंटेनरयुक्त मालवहन करणारी श्रेयस शिपिंग ही एकमेव कंपनी असून, अलीकडेच तिने दुबई येथून एसएसएल गुजरात हे आणखी एक जहाज आपल्या ताफ्यात सामील करून सेवाक्षमतेत मोठी भर घातली आहे. याचा परिणाम कंपनीच्या वित्तीय कामगिरीत स्पष्टपणे उमटला असून, कंपनीने डिसेंबरअखेर तिमाहीत २२.३७ कोटींचा निव्वळ नफा कमावला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला २.९१ कोटी तोटा झाला होता. भारताच्या संपूर्ण सागरकिनाऱ्यावर नौकावहन आणि त्यांचे अंतर्गत जलमार्ग जाळ्यांशी एकात्मीकरणाच्या सरकारच्या ‘सागरी माला’ प्रकल्पाला अनुसरून सेवा देण्यासाठी कंपनीने पूर्ण तयारी केली आहे, असे श्रेयस शिपिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रमेश एस. रामकृष्ण यांनी सांगितले. एमव्हीएल व्हिक्टरी या जहाजाला ‘एसएसएल सागरमाला’ असे अद्ययावत रूप देत ते या प्रकल्पासाठी पूर्णपणे समर्पित करण्याचाही कंपनीने निर्णय घेतला आहे. शिवाय आपल्या संपूर्ण अंगीकृत कंपन्यांमार्फत नवीन अपारंपरिक मालवहन (लिक्विड लॉजिस्टिक्स) करण्याकडे कंपनीचे लक्ष आहे. तर नजीकच्या काळात ई-व्यापार या नव्या व्यवसायात विस्ताराच्या योजना आहेत.