जामिनासाठीची रक्कम उभी करण्याकरिता नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात उपलब्ध करून देण्यात आलेल्या अद्ययावत सुविधेपोटी सहारा समूह प्रमुख सुब्रता रॉय यांनी ३१ लाख रुपये भरले आहेत.
गुंतवणूकदारांची रक्कम परस्पर अन्य योजनांमध्ये वळविल्याप्रकरणी रॉय हे मार्चपासून तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्या जामिनासाठी १० हजार कोटी रुपये भरण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ही रक्कम उभारण्यासाठी रॉय यांच्या मागणीनुसार तुरुंगाच्या आवारातच अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. समूहातील मालमत्ता विक्रीसाठी उपलब्ध वातानुकूलित यंत्र, मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, इंटरनेट, फोन आदी सुविधांचा रॉय यांनी ५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर असे ५७ दिवस वापर केला. ही प्रक्रिया पूर्ण होताच ३१ लाख रुपये तुरुंग प्रशासनाला देण्यात आले आहेत.