गुजरातचा कित्ता महाराष्ट्रातही गिरविला जाणार?

डाळींच्या टंचाईवर मात करून बाजारातील पुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून बडय़ा आयातदारांवरील साठवणीच्या मर्यादा शिथिल करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. कडाडलेल्या तूर व मूग डाळीचे भाव पाहता, केंद्राने गेल्या आठवडय़ात (१८ ऑक्टोबरला) साठेबाजीला प्रतिबंध म्हणून ही मर्यादा घातली होती. पण गुजरातने बडय़ा आयातदार व्यापाऱ्यांसाठी ही मर्यादा शिथिल केल्यानंतर महाराष्ट्रानेही तेच पाऊल टाकण्याचे ठरविलेले दिसते.

तीन दिवसांपूर्वी डाळींच्या आयातदारांची संघटना असलेल्या मुंबईस्थित ‘आयपीजीए’चे अध्यक्ष प्रवीण डोंगरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन आयातदारांवरील डाळींच्या साठवणुकीचे र्निबध हटविण्याची मागणी केली होती. संघटनेचा हा प्रस्ताव केंद्राने राज्यांकडे विचारार्थ पाठविल्याचे समजते. गुजरातने आधीच निर्णय घेऊन हे र्निबध शिथिल केले तर महाराष्ट्रातही हे र्निबध उठविले जाण्याची शक्यता आहे.

आयात होणाऱ्या डाळींची राज्यात सध्या सरासरी ३०० ते ३५० टन इतकी आयातदारांकडून मर्यादित काळासाठी साठवण होणे अपरिहार्यच असल्याचे डोंगरे यांचे म्हणणे आहे. या संबंधाने घातलेले र्निबध हटविले गेल्यास तूर डाळीचा प्रति किलो १३० रुपये दराने दररोज १०० टन पुरवठा नागपूर, खोपोली आणि मलकापूर अशा तीन केंद्रांतून महिनाभरासाठी नियमितपणे करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आयातदारांनी २५ लाख टन डाळींच्या जानेवारीपर्यंत पुरवठय़ाचे करार पूर्ण केले आहेत.

मुंबईतील छाप्यात ४३.५ हजार टन डाळ जप्त

साठेबाजांवर धडक कारवाईअंतर्गत मुंबई-ठाणे परिसरात टाकण्यात आलेल्या २३ धाडींमध्ये ४३,९७५ टन डाळ जप्त केली गेली आहे. उच्च प्रतवारीच्या या डाळीचे मूल्य सुमारे २७१ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. शिधावाटप नियंत्रक आणि नागरीपुरवठा विभागाच्या संचालिका श्वेता सिंघल यांच्या नेतृत्वात तयार केलेल्या वेगवेगळ्या २३ संघांकडून या धाड मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. सरकारच्या अंदाजाप्रमाणे या जप्त झालेल्या डाळी बाजारात आल्यास तूर डाळीचे भाव किलोमागे ५० रुपयांनी खाली येऊ शकतील.