X

टीव्हीच्या किमतींची कोटीच्या कोटी उड्डाणे

ग्राहकवर्गाला लक्ष्य करत ‘एलईडी फॉर होम’ हे नवीन डिस्प्ले उत्पादन भारतात पहिल्यांदाच सादर केले आहे.

सॅमसंगकडून कोटय़धीशांसाठी ‘एलईडी फॉर होम’

मुंबई : नव्या डिजिटल जमान्याला शोभेल असा रंगसाज हा सॅमसंगसारख्या कंपनीसाठी अनेकार्थाने मोठी व्यवसाय संधी ठरली असून, या कंपनीने अतिधनाढय़ ग्राहकवर्गाला लक्ष्य करत ‘एलईडी फॉर होम’ हे नवीन डिस्प्ले उत्पादन भारतात पहिल्यांदाच सादर केले आहे.

कंपनीने अलीकडेच सिनेमागृहात प्रस्तुत केलेल्या ‘ओनिक्स’ या डिजिटल डिस्प्लेची ही घरगुती आवृत्ती असल्याचे सॅमसंग इंडियाचे या व्यवसाय विभागाचे प्रमुख पुनीत सेठी यांनी सांगितले. ११० इंच ते २६० इंच अशा वेगवेगळ्या चार आकारांत उपलब्ध या दूरचित्रवाणी संचाची किंमत किमान १ कोटी रुपयांपासून सुरू होऊन कमाल ३.५ कोटी रुपयांपर्यंत जाणारी आहे. अत्यंत सडपातळ सुबक रचना आणि एचडीआर तंत्रज्ञान यातून घरबसल्या ग्राहकांना सिनेगृहात बसल्याप्रमाणे टीव्ही पाहण्याचा समृद्ध अनुभव मिळेल, असे सेठी यांनी स्पष्ट केले. सॅमसंगने अलीकडे दिल्ली येथील पीव्हीआरच्या पहिल्या सिनेगृहात तुलनेने मोठय़ा आकाराच्या ‘ओनिक्स’ डिजिटल डिस्प्लेवर चित्रपटांचे प्रदर्शन सुरू केले आहे. पुढे जाऊन पीव्हीआरच्या देशभरात अन्य सिनेगृहांत तसेच आयनॉक्स आणि सिनेमॅक्स अन्य प्रदर्शनकर्त्यांशी या संबंधाने कंपनीची बोलणी सुरू आहेत. सॅमसंगचा हा ‘एलईडी फॉर होम’ गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन संकुलात २० सप्टेंबपर्यंत सुरू असणाऱ्या ‘इन्फोकॉम इंडिया’ प्रदर्शनात मांडण्यात आला आहे. डिजिटायझेशन जसे वेग घेईल तसे विमानतळ-मेट्रो स्थानके, आधुनिक विक्री केंद्रे, कॉर्पोरेट कार्यालये, हॉटेल्स आणि आऊटडोअर साइनेज आणि व्हिडीओ वॉल म्हणून डिजिटल डिस्प्लेचा वाढणारा वापर सॅमसंगसाठी व्यवसाय संधी ठरेल.