भारतीय लघु उद्योजकांना तंत्रज्ञानाचे पाठबळ देण्याच्या उद्देशाने ‘एसएपी’ या कंपनीने एक ‘इनोव्हेशन एक्स्प्रेस’ सुरू केली आहे. यामध्ये एखाद्या व्यवसायाला उपयुक्त अशा तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून तज्ज्ञांचे मार्गदर्शनही या माध्यमातून लाभणार आहे. ही एक्स्प्रेस देशातील १२ शहरांमध्ये फिरणार आहे.
देशात लघु उद्योगांच्या विकासाला खूप मोठा वाव असून त्यांना तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ते अधिक चांगली प्रगती करू शकतात असा विश्वास व्यक्त करत कंपनीच्या एशिया पॅसिफिक जपानचे अध्यक्ष एडायर फॉक्स मार्टीन यांनी ‘इनोव्हेशन एक्स्प्रेस’च्या बसला हिरवा झेंडा दाखविला. लघु उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर ते सध्याच्या काळातील ग्राहकांपर्यंत पोहचू शकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी एसएपीने केलेल्या एका सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला. यानुसार ८७ टक्के लघु उद्योजकांना उद्योगाच्या विकासासाठी अ‍ॅप्लिकेशन, मोबाइल सोल्युशन महत्त्वाची भूमिका बजावते असे वाटते. तर देशातील बहुतांश उद्योग हे तंत्रज्ञान आपल्याकडे प्रथम कसे वापरता येईल यासाठी उत्सुक असल्याचेही सर्वेक्षणात दिसून आले. एसएपीच्या ‘इनोव्हेशन एक्स्प्रेस’च्या माध्यमातून लघु उद्योजकांना जागतिक पातळीवर स्पर्धा करणे शक्य होणार असल्याचे एसएपी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रवी चौहान यांनी स्पष्ट केले. एसएपीची ही एक्स्प्रेस ५००० किमी प्रवास करणार असून दोन महिन्यांच्या प्रवासात ती२ देशातील पुणे, औरंगाबाद, नाशिक, सुरत, बडोदा, राजकोट, अहमदाबाद, गांधीनगर, जयपूर, मानेसर, गुरगाव आणि नोएडा या शहरांमध्ये जाणार आहे.